भारताचे स्थान कायम : ‘चॅम्पियन्स’ पोहचले सहाव्या स्थानावर

By admin | Published: June 20, 2017 12:00 AM2017-06-20T00:00:58+5:302017-06-20T00:00:58+5:30

पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर आयसीसी वन-डे क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करताना सहावे स्थान पटकावले आहे

India retains the place: 'Champions' reached number six | भारताचे स्थान कायम : ‘चॅम्पियन्स’ पोहचले सहाव्या स्थानावर

भारताचे स्थान कायम : ‘चॅम्पियन्स’ पोहचले सहाव्या स्थानावर

Next

दुबई : पाकिस्तानने चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत जेतेपद पटकावल्यानंतर आयसीसी वन-डे क्रमवारीत दोन स्थानांची प्रगती करताना सहावे स्थान पटकावले आहे तर अंतिम फेरीत स्थान मिळवणारा भारतीय संघ तिसऱ्या स्थानी कायम आहे.
पाकिस्तानने श्रीलंका व बांगलादेशला पिछाडीवर सोडताना २०१९ च्या विश्वकप स्पर्धेसाठी थेट पात्रता मिळवण्याच्या दिशेने पाऊल टाकले आहे. २०१९ च्या विश्वकप स्पर्धेसाठी यजमान इंग्लंड आणि ३० सप्टेंबरपर्यंत अव्वल सात मानांकित संघांना थेट प्रवेश मिळणार आहे.
पाकला चार मानांकन गुणांचा लाभ झाला असून त्यांच्या खात्यावर ९५ मानांकन गुणांची नोंद आहे. कारण पाकने या स्पर्धेत वरचे मानांकन असलेल्या संघाविरुद्ध विजय मिळवला आहे. त्यात अंतिम फेरीत भारताचा आणि उपांत्य फेरीत इंग्लंडचा केलेल्या पराभवांचा समावेश आहे.
वन-डे खेळाडूंच्या क्रमवारीत भारताचा सलामीवीर रोहित शर्माने उपांत्य लढतीत नाबाद १२३ धावांची खेळी केली. त्यामुळे त्याला तीन स्थानांचा लाभ झाला असून तो १०व्या स्थानी दाखल झाला आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने चार स्थानांची प्रगती करताना संयुक्तपणे १९ व्या स्थानी झेप घेतली आहे. जसप्रीत बुमराहला १९ स्थानांचा लाभ झाला असून तो २४ व्या स्थानी आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अली व सलामीवीर फलंदाज फखर झमान यांना क्रमवारीत मोठा लाभ झाला आहे. हसनने १३ बळी घेतले असून तो ‘प्लेअर आॅफ द टूर्नांमेन्ट’ पुरस्काराचा मानकरी ठरला. त्याला १२ स्थानांचा लाभ झाला असून तो सातव्या स्थानी दाखल झाला आहे. पाठदुखीमुळे मोहम्मद आमिरला उपांत्य फेरीत खेळता आले नव्हते, पण अंतिम लढतीत १६ धावांत ३ बळी घेणाऱ्या आमिरने १६ स्थानांनी प्रगती केली असून तो २१ व्या स्थानी आहे. जुनेद खानला नऊ स्थानांचा लाभ झाला असून तो ४७ व्या स्थानी आहे.
सामनावीर पुरस्काराचा मानकरी फखर जमानने अंतिम लढतीत ११४ व उपांत्य लढतीत ५७ धावांची खेळी केली. केवळ चार वन-डे सामने खेळल्यानंतर अव्वल १०० मध्ये दाखल होण्यात तो यशस्वी ठरला. त्याला या दोन लढतींमध्ये केलेल्या कामगिरीचा लाभ झाला आहे. त्याने ५८ स्थानांची प्रगती करताना ९७ व्या स्थानी झेप घेतली आहे.
बाबर आजमने अंतिम लढतीत ४६ व उपांत्य लढतीत नाबाद ३० धावांची खेळी केली होती. त्याने तीन स्थानांची प्रगती करताना कारकिर्दीतील सर्वोत्तम पाचव्या स्थानी झेप घेतली. मोहम्मद हफीजला दोन स्थानांचा लाभ झाला असून तो २० व्या स्थानी आहे. सलामीवीर अझहर अलीला ११ स्थानांचा लाभ झाला असून तो ३१ व्या स्थानी आहे.
बांगलादेशचा कर्णधार
मशरफी मुर्तजाला गोलंदाजी मानांकनामध्ये तीन स्थानांचा लाभ झाला असून तो १५ व्या स्थानी आहे. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या इंग्लंड संघातील चार फलंदाज अव्वल २० मध्ये आहेत. जो रुट चौथ्या, अ‍ॅलेक्स हेल्स १७ व्या, इयोन मॉर्गन १८ व्या आणि बटलर १९ व्या स्थानी कायम आहेत. 

Web Title: India retains the place: 'Champions' reached number six

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.