भारतापुढे दुसरे स्थान गमावण्याचा धोका
By admin | Published: January 22, 2016 03:02 AM2016-01-22T03:02:23+5:302016-01-22T03:02:23+5:30
आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग चार वन-डे सामने गमाविल्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत ०-४ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघापुढे आयसीसी वन-डे क्रमवारीतील आपले दुसरे स्थान गमावण्याचा धोका आहे
नवी दिल्ली : आॅस्ट्रेलिया दौऱ्यावर सलग चार वन-डे सामने गमाविल्यामुळे पाच सामन्यांच्या मालिकेत ०-४ ने पिछाडीवर असलेल्या भारतीय संघापुढे आयसीसी वन-डे क्रमवारीतील आपले दुसरे स्थान गमावण्याचा धोका आहे. भारताला जर सिडनी येथे २३ जानेवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पाचव्या व अखेरच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला तर तो भारतीय संघाचा ४०० वा पराभव ठरेल.
भारताने मालिकेतील पहिल्या चारही सामन्यांत फलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी केली, पण मोक्याच्या क्षणी चुका झाल्यामुळे पराभव स्वीकारावा लागला. चौथ्या लढतीत विजय मिळवण्याची चांगली संधी असताना भारतीय संघाने ती गमावली. क्रमवारीतील दुसरे स्थान कायम राखण्यात आता भारताला २३ जानेवारी रोजी सिडनी येथे होणाऱ्या पाचव्या व अखेरच्या लढतीत कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवावा लागेल. भारताला मालिकेत ०-५ ने पराभव स्वीकारावा लागला तर भारतीय संघ क्रमवारील दक्षिण आफ्रिकेपेक्षा पिछाडीवर पडेल. अशा परिस्थितीत भारत आणि न्यूझीलंड संघांचे समान १११ मानांकन गुण राहतील, पण दशांश गुणांच्या फरकाने भारतीय संघ तिसऱ्या आणि न्यूझीलंड संघ चौथ्या स्थानावर राहील.
भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानी पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्ध दक्षिण आफ्रिका संघाला तिसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय संघ अव्वल स्थानी दाखल झाला आहे, पण आॅस्ट्रेलियाविरुद्ध पाचवी लढत गमावल्यानंतर वन-डे क्रमवारीत भारताची घसरण होणार आहे. मालिकेपूर्वी आॅस्ट्रेलिया (१२७) अव्वल तर भारत (११४) दुसऱ्या स्थानी होता. दक्षिण आफ्रिका (११२) संघ तिसऱ्या स्थानावर होता. (वृत्तसंस्था)
> भारताने आतापर्यंत एकूण ८९५ सामने खेळले असून जगातील अन्य संघांच्या तुलनेत ही संख्या सर्वाधिक आहे. भारताने यात ४५० सामने जिंकले असून ३९९ सामन्यांत भारताला पराभव स्वीकारावा लागला आहे. सात सामने टाय झाले तर ३९ सामन्यांत निकाल शक्य झाला नाही.
दुसऱ्या बाजूचा विचार करता विश्व चॅम्पियन आॅस्ट्रेलिया संघाने ८६६ सामन्यांत ५३७ विजय मिळवले आहेत तर त्यांना २८९ सामन्यांत पराभव स्वीकारावा लागला आहे.