भारत २०० धावांत गारद

By admin | Published: June 22, 2015 01:33 AM2015-06-22T01:33:56+5:302015-06-22T01:33:56+5:30

भारतीय फलंदाज बांगलादेशचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे

India scored 200 runs | भारत २०० धावांत गारद

भारत २०० धावांत गारद

Next

मीरपूर : भारतीय फलंदाज बांगलादेशचा युवा डावखुरा वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमानविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र रविवारी खेळल्या गेलेल्या दुसऱ्या वन-डे लढतीतही कायम राहिले. मुस्तफिजुरच्या (६-४३) अचूक माऱ्याच्या जोरावर यजमान बांगलादेशने दोनदा विश्वविजेतेपदाचा मान मिळविणाऱ्या भारतीय संघाचा डाव ४५ षटकांत २०० धावांत गुंडाळला. पावसाच्या व्यत्ययामुळे ही लढत प्रत्येकी ४७ षटकांची खेळविण्याचा निर्णय घेण्यात आला.
१९ वर्षीय वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर पहिल्या दोन वन-डे सामन्यांत दोनदा पाच बळी घेण्याची कामगिरी करणारा वन-डे क्रिकेट इतिहासातील दुसरा गोलंदाज ठरला. झिम्बाब्वेचा डावखुरा वेगवान गोलंदाज ब्रायन व्हिटोरीने यापूर्वी अशी कामगिरी केली होती. बांगलादेशपुढे डकवर्थ-लुईस नियमानुसार ४७ षटकांत २०० धावा फटकावण्याचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताच्या केवळ पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवण्यात यश आले. शिखर धवनने सर्वाधिक ५३ धावांची खेळी केली. कर्णधार धोनी (४७) व सुरेश रैना (३४) यांनी संघर्षपूर्ण खेळी केली. पदार्पणाच्या लढतीत पाच बळी घेणाऱ्या मुस्तफिजुरला नासिर हुसेन व रुबेल हुसेन यांनी प्रत्येकी दोन बळी घेत योग्य साथ दिली. मुस्तफिजुर पहिल्या दोन सामन्यांत ११ बळी घेणारा जगातील पहिला गोलंदाज ठरला. त्याने झिम्बाब्वेच्या ब्रायन व्हिटोरीचा (१० बळी) विक्रम मोडला.
मुस्तफिजुरच्या भेदक माऱ्यापुढे भारताला पहिल्या लढतीत ७९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मालिकेतील आव्हान कायम राखण्यासाठी भारताला या लढतीत विजय मिळवणे आवश्यक आहे.
भारताची ४३.५ षटकांत ८ बाद १९६ अशी अवस्था असताना पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबविण्यात आला. त्यानंतर जवळजवळ दोन तास खेळ शक्य झाला नाही. पाऊस थांबल्यानंतर पुन्हा खेळ सुरू झाला त्यावेळी बांगलादेशने केवळ सात चेंडूंच्या अंतरात भारताच्या उर्वरित दोन फलंदाजांना माघारी परतवले. यानंतर बांगलादेशला ४७ षटकांत डकवर्थ लुईस नियमानुसार १९९ धावांचे लक्ष्य मिळाले. यजमानांनी सावध सुरुवात करताना विजयाच्या दिशेने कूच केली
अजिंक्य रहाणेला वगळण्याचा भारताचा निर्णय चुकीचा ठरला. प्रथम फलंदाजी स्वीकारणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात निराशाजनक झाली. रोहित शर्मा (०) खाते न उघडताच डावाच्या दुसऱ्याच चेंडूवर बाद झाला. त्यानंतर धवन व विराट कोहली (२३) यांनी सावधगिरी बाळगत फलंदाजी केली. कोहलीने मुस्तफिजुरच्या गोलंदाजीवर षटकार व चौकार वसूल करीत आपले इरादे स्पष्ट केले. धवनने मुर्तजाच्या गोलंदाजीवर सलग दोन चौकार ठोकले. नासिर हुसेनने कोहलीला पायचित करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. कोहली व धवन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ७४ धावांची भागीदारी केली. भारतीय संघ दडपणाखाली असताना कर्णधार धोनीने वरच्या क्रमांकावर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. धोनी वैयक्तिक २० धावांवर असताना नासिर हुसेनच्या गोलंदाजीवर यष्टिरक्षक लिट्टन दासने त्याला जीवदान दिले. दासने याच षटकात त्यानंतर धवनचा झेल टिपत भारताला तिसरा धक्का दिला. धवनने ६० चेंडूंच्या खेळीमध्ये ७ चौकार लगावले.
अंबाती रायडू (०) चुकीचा फटका खेळून बाद झाला. त्यानंतर धोनी व रैना यांनी पाचव्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी करीत डाव सावरण्याच्या आशा निर्माण केल्या, पण मुस्तफिजुरने पॉवर प्लेमध्ये रैना, धोनी व पटेल यांना माघारी परतवत बांगलादेशला वर्चस्व मिळवून दिले. भारताने पॉवर प्लेमध्ये १७ धावांच्या मोबदल्यात ३ फलंदाज गमावले. रविंचद्रन अश्विनला (४) बाद करीत सामन्यातील पाचवा बळी घेणारा मुस्तफिजुर अखेरच्या षटकात गोलंदाजी करीत असताना पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे खेळ थांबवण्यात आला. पावसानंतर त्याने जडेजला (१९) बोल्ड केले. हुसेनने भुवनेश्वरला बाद करीत भारताचा डाव संपुष्टात आणला. अखेरचे वृत्त हाती आले तेव्हा बांग्लादेशने १० षटकांत १ बाद ४९ धावा अशी मजल मारली होती.

Web Title: India scored 200 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.