भारत कसोटी क्रमवारीत दुसऱ्या स्थानी- आयसीसी
By Admin | Published: July 12, 2016 09:56 PM2016-07-12T21:56:03+5:302016-07-12T21:56:03+5:30
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या नव्या क्रमावारीनुसार टीम इंडिया कसोटीत दुसऱ्या स्थानी आहे.
ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 12 - आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केलेल्या नव्या क्रमावारीनुसार टीम इंडिया कसोटीत दुसऱ्या स्थानी आहे. मात्र तिसऱ्या स्थानी असलेल्या पाकिस्तानला इंग्लंडविरुध्द विजय मिळवून भारताला मागे टाकण्याची संधी आहे. त्याचवेळी भारताचा रविचंद्रन अश्विन अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत अव्वलस्थानी असून गोलंदाजांमध्ये द्वितीय स्थानी आहे.
कसोटी क्रमवारीत पाकिस्तान संघ भारतापेक्षा केवळ एका गुणाने मागे आहे. जर पाकिस्तानने इंग्लंडविरुध्दची चार सामन्यांची कसोटी मालिका २-१ अशी किंवा ३-१ अशी जिंकली, तर ते टीम इंडियाला मागे टाकून द्वितीय स्थानी पोहचेल. भारताचे ११२ गुण असून ंपाकिस्तानचे १११ गुण आहेत.
भारत, पाकिस्तान आणि चौथ्या स्थानी असलेल्या इंग्लंड यांच्या गुणामध्ये खूप कमी अंतर आहे. विशेष म्हणजे २००३ पासून अधिकृतपणे क्रमवारी जाहीर होण्यास सुरुवात झाल्यानंतर केवळ एकदाच पाकिस्तानने द्वितीय स्थान पटकावले आहे. त्याचबरोबर पाकिस्तानकडे अव्वल स्थानी असलेल्या आॅस्टे्रलियालाही हटविण्याची संधी आहे. परंतु, त्यासाठी त्यांना इंग्लंडविरुध्द ३-० अशी बाजी मारावी लागेल.
त्याचवेळी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थानी असलेल्या इंग्लंडच्या जेम्स अँडरसनवर अग्रस्थान गमावण्याची वेळ येणार आहे. खांद्याच्या दुखापतीमुळे तो लॉडर््स कसोटी सामना खेळणार नाही. नियमानुसार जर, कोणी खेळाडू आपल्या संघाकडून एखादा कसोटी सामना खेळत नसेल,तर त्याच्या गुणांमध्ये एका टक्क्याची कपात होते. अशापरिस्थितीत अँडरसनची आपल्याहून सहा गुणांनी मागे असलेल्या भारताच्या अश्विनच्या मागे घसरण होईल.