भारताचा मालिका विजय
By admin | Published: June 23, 2016 01:55 AM2016-06-23T01:55:51+5:302016-06-23T01:55:51+5:30
टी-२० मालिकेचा अंतिम सामना म्हणून मानलेल्या लढतीत भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवित मालिका २-१ने खिशात घातली
हरारे : टी-टष्ट्वेन्टी मालिकेचा अंतिम सामना म्हणून मानलेल्या लढतीत भारताने शेवटच्या चेंडूवर विजय मिळवित मालिका २-१ने खिशात घातली. बरिंदर सरन याने मोक्याच्या क्षणी संतुलन ढळू न देता केलेल्या अचूक गोलंदाजीच्या बळावर भारताने शेवटच्या चेंडूवर झिम्बाब्वेची विकेट काढत ३ धावांनी विजय मिळविला.
भारताने केदार जाधव (५८) याच्या दमदार अर्धशतकाच्या बळावर २० षटकांत ६ बाद १३८ धावांचे आव्हान उभे केले. तुलनेने या सोप्या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या झिम्बाब्वेला भारताने २० षटकांत ६ बाद १३५ धावांत रोखले. भारताच्या गोलंदादाजांनी झिम्बाब्वेच्या फलंदाजांना जखडून ठेवण्यात यश मिळविले होते. शेवटच्या षटकांत त्यांना विजयासाठी २१ धावा आवश्यक होत्या. शेवटचे षटक टाकण्यासाठी कर्णधार महेंद्रसिंग धोणीने सरन याच्याकडे चेंडू सोपविला. पहिल्याच चेंडूवर टिमीसेन मारूमा (१३ चेंडूत नाबाद २३ धावा) षटकार खेचला. त्यानंतरचा चेंडू वाईड गेला. पाठोपाठच्या नो बॉलवर चौकार मारला. त्यामुळे एकाच वैध चेंडूवर झिम्बाब्वेला १२ धावा मिळाल्या. फ्री हिट व त्यानंतरचा चेंडू निर्धाव टाकण्यात सरनला यश मिळाले. त्यानंतर मारुमाने एक धाव घेत एल्टन चिगुंबुराकडे (१६ चेंडूत १६ धावा) पुढील जबाबदारी सोपविली. चिगुंबुराने पाचव्या चेंडूवर चौकार मारला. त्यामुळे अखेरच्या चेंडूवर झिम्बाब्वेला चार धावांची आवश्यकता होती. अखेरच्या चेंडूवर फटका मारण्याच्या प्रयत्नात चिगुंबुराने युजुवेंद्र चहलकडे झेल दिला. त्यामुळे त्यांना सामन्यासह मालिका देखील गमावली. चामू चिभाभा (५), हॅमिल्टन मसाकाद्झा (१५) ही सलामीची जोडी परतल्यानंतर वुसी सिबांदा (२८), पीटर मूर (२६) यांच्या खेळीने झिम्बाब्वेने विजयाचे आव्हान कायम ठेवले.
तत्पूवी, भारताला सलामीवीर लोकेश राहुल (२२), मनदीप सिंग (४), अंबाती रायुडू (२०), मनिष पांडे (०) ठराविक अंतराने बाद झाले. त्या नंतर आलेल्या केदार जाधव याने ४२ चेंडूत ७ चौकार व एका षटकाराच्या साहाय्याने ५८ धावांची खेळी करून संघाच्या डावाला आकार दिला. अक्षर पटेल याने ११ चेंडूत एका षटकाराच्या सहाय्याने नाबाद २० धावा फटकाविल्या.
वनडेच्या तुलनेत टी-२० स्पर्धेत युवा खेळाडूंना अधिक शिकायला मिळाले. या खेळाडूंचा हा अनुभव त्यांच्या पुढील कारकिर्दीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. झिम्बाब्वे संघाने चांगले प्रदर्शन केले. या मालिकेतून संघाला १०-१२ गोलंदाजांची फळी तयार करण्यास मदत मिळाली आहे. वेगवान गोलंदाजीच्या विभागात आपल्याला चांगले खेळाडू तयार करण्याची आवश्यकता आहे. आता आम्ही अभिमानाने सांगू शकतो, की आमच्याकडे खेळाडू असे आहेत जे देशासाठी आगामी काळात खेळू शकतात. वनडे मालिका ३-०ने जिंकल्यानंतर टी-२० मालिका २-१ ने जरी जिंकली असली, तरी संघातील सर्व खेळाडूंची कामगिरी चांगली झालेली आहे.- महेंद्रसिंह धोनी
धावफलक :
भारत : २० षटकांत ६ बाद १३८ धावा, लोकेश राहुल २२ त्रि.गो. मादझिव्हा, अंबाती रायुडु झे. एल्टन चिगुम्बुरा गो. ग्रॅमी क्रेमर २०, केदार जाधव झे. चिगुंबुरा गो. डोनाल्ड तिरिपानो ५८, एमएस धोणी त्रि.गो. तिरिपानो ९, अक्षर पटेल नाबाद नाबाद२०, धवल कुलकर्णी नाबाद १.
झिम्बाब्वे : २० षटकांत ६ बाद १३५; चामू चिभाभा झे. यजुवेंद्र चहल गो. बरिंंदर शरण ५, हॅमिल्टन हसाकाद्झा पायचित गो. अक्षर पटेल १५, उसीसी सिबांदा पायचित गो. धवल कुलकर्णी २८, पीटर मूर झे. मनदीप सिंग गो. चहल २६, एल्टन चिगुम्बुरा झे. चहल गो. शरण १६, टिमीसेन मारुमा नाबाद २३.