भारताचा मालिका विजय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2016 03:30 AM2016-02-15T03:30:18+5:302016-02-15T03:30:18+5:30
रविचंद्रन आश्विनने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना रविवारी ४ षटकांत ८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले.
आश्विनचा अचूक मारा : टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान कायम
विशाखापट्टणम : रविचंद्रन आश्विनने कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी करताना रविवारी ४ षटकांत ८ धावांच्या मोबदल्यात ४ बळी घेतले. आश्विनच्या कामगिरीच्या जोरावर भारताने तिसऱ्या व निर्णायक टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात श्रीलंकेचा ३७ चेंडू व ९ गडी राखून पराभव करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी सरशी साधली. भारताने या विजयासह टी-२० क्रमवारीत अव्वल स्थान कायम राखले, तर श्रीलंका संघ चौथ्या स्थानी आहे.
भारताने श्रीलंकेचा डाव १८ षटकांत ८२ धावांत गुंडाळला आणि विजयासाठी आवश्यक धावा १३.५ षटकांत एक गडी गमावत पूर्ण केल्या. सलामीवीर शिखर धवन (४६ धावा, ५ चौकार, १ षटकार) आणि अजिंक्य रहाणे (२२) यांना दुसऱ्या विकेटसाठी ५५ धावांची अभेद्य भागीदारी करीत भारताला विजयावर शिक्कामोर्तब करून दिले. पुणे येथील सलामी लढतीत पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाने रांची येथील दुसऱ्या लढतीत ६९ धावांनी विजय मिळवला होता. तिसऱ्या व अखेरच्या लढतीत भारतीय गोलंदाजांची कामगिरी संस्मरणीय ठरली. श्रीलंकेच्या केवळ दोन फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. त्यात दासून शनाकाने सर्वाधिक १९ धावा फटकावल्या. पाहुण्या संघाची टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील ही नीचांकी धावसंख्या ठरली.
नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारण्याचा कर्णधार धोनीचा निर्णय गोलंदाजांनी सार्थ ठरवला. या लढतीत भारतीय गोलंदाजांनी सुरुवातीपासून वर्चस्व गाजवले. आश्विनव्यतिरिक्त भारतातर्फे सुरेश रैनाने २ षटकांत ६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले. जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा व आशिष नेहरा यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. श्रीलंकेचा हा टी-२० क्रिकेटमधील धावसंख्येचा नीचांक ठरला. यापूर्वीची नीचांकी धावसंख्या ८७ होती. २०१० मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध ब्रिजटाऊनमध्ये श्रीलंका संघाने केवळ ८७ धावा फटकाविल्या होत्या. १०० धावांचा पल्ला गाठण्यात अपयशी ठरण्याची श्रीलंका संघाची ही चौथी वेळ आहे.
धोनीने सुरुवातीलाच आपला हुकमी एक्का आश्विनकडून गोलंदाजीची सुरुवात केली. आॅफ स्पिनर आश्विनने लुप व फ्लाईटच्या जोरावर श्रीलंकेच्या आघाडीच्या फळीतील फलंदाजांना एकापाठोपाठ माघारी परतवले. पहिल्या षटकात त्याने निरोशन डिकवाला (१) व तिलकरत्ने दिलशान (१) यांना माघारी परतवले. आश्विनने त्यानंतरच्या षटकात कर्णधार दिनेश चंदीमल (८) याचा अडथळा दूर केला. पदार्पणाची लढत खेळणाऱ्या असेला गुणरत्ने (४) याला बाद करीत आश्विनने वैयक्तिक चौथा बळी घेतला. (वृत्तसंस्था)
धावफलक
श्रीलंका :- निरोशान डिकवाला यष्टिचीत धोनी गो. आश्विन १, तिलकरत्ने दिलशान पायचीत गो. आश्विन १, दिनेश चांदीमल झे. पांड्या गो. आश्विन ८, असेला गुनारत्ने झे. रैना गो. आश्विन ४, मिलिंदा सिरिवर्धने त्रि. गो. नेहरा ४, दसून शानका त्रि. गो. जडेजा १९, सीकुगे प्रसन्ना धावबाद ९, थिसारा
परेरा झे. जडेजा गो. रैना १२, सचित्रा सेनानायके झे. धोनी गो. रैना ८,
दुश्मंता चमिरा नाबाद ९, दिलहारा फर्नांडो त्रि.गो. बुमराह १. अवांतर (६). एकूण १८ षटकांत सर्वबाद ८२. गोलंदाजी : रविचंद्रन आश्विन ४-१-८-४, आशिष नेहरा २-०-१७-१, जसप्रीत बुमराह ३-०-१०-१, रवींद्र जडेजा ४-१-११-१, युवराज सिंग १-०-१५-०, हार्दिक पांड्या २-०-१३-०, सुरेश रैना २-०-६-२.
भारत :- रोहित शर्मा पायचीत गो. चमिरा १३, शिखर धवन नाबाद ४६, अजिंक्य रहाणे नाबाद २२. अवांतर (३). एकूण १३.५ षटकांत १ बाद ८४. बाद क्रम : १-२९. गोलंदाजी : सेनानायके ४-०-२२-०, फर्नांडो २-०-७-०, चमिरा २-०-१४-१, प्रसन्ना १-०-३-०, श्रीवर्धने १-०-९-०, गुणरत्ने २.५-०-२२-०, दिलशान १-०-४-०.