भारत ‘अ’चा मालिकाविजय

By admin | Published: September 21, 2015 12:04 AM2015-09-21T00:04:18+5:302015-09-21T00:04:18+5:30

डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी सूर गवसल्याचे संकेत देताना रविवारी शतकी खेळी केली.

India A's series win | भारत ‘अ’चा मालिकाविजय

भारत ‘अ’चा मालिकाविजय

Next

रैनाची शतकी खेळी : बांगलादेश ‘अ’ संघावर ७५ धावांनी मात
बंगळुरू : डावखुरा फलंदाज सुरेश रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी सूर गवसल्याचे संकेत देताना रविवारी शतकी खेळी केली. रैनाच्या शतकी खेळीच्या जोरावर भारत ‘अ’ संघाने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या तिसऱ्या व अखेरच्या अनधिकृत वन-डे क्रिकेट सामन्यात बांगलादेश ‘अ’ संघाविरुद्ध डकवर्थ लुईस नियमाच्या आधारावर ७५ धावांनी विजय मिळवला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी सरशी साधली.
गेल्या दोन सामन्यांत झटपट बाद होणाऱ्या रैनाने ९४ चेंडूंना सामोरे जाताना नऊ चौकार व एका षटकाराच्या मदतीने १०४ धावांची खेळी केली. शतकी खेळीदरम्यान रैनाने संजू सॅमसनसोबत (९०) तिसऱ्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी करीत भारताला ६ बाद २९७ धावांची दमदार मजल मारून दिली. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेश ‘अ’ संघाचा डाव उशिराने सुरू झाला. पावसाच्या व्यत्ययामुळे बांगलादेश ‘अ’ संघापुढे ३२ षटकांत २१७ धावा फटकावण्याचे सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. लक्ष्याचा पाठलाग करताना बांगलादेश ‘अ’ संघाला ६ बाद १४१ धावांची मजल मारता आली. शब्बीर रहमानने नाबाद ४१ धावांची खेळी केली, तर कर्णधार मोमिनुल हकने ३७ धावा फटकावल्या. वेगवान गोलंदाज श्रीनाथ अरविंदने ६ षटकांत १४ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेत चार वर्षांनंतर भारतीय संघात स्थान मिळाल्याचा आनंद साजरा केला. फिरकीपटू कुलदीप यादवने २९ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले.
रैनासाठी ही शतकी खेळी महत्त्वाची ठरली. कारण जून महिन्यापासून रैना आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. भारताची सुरुवात निराशाजनक झाली. मयंक अग्रवाल (४) झटपट बाद झाला. त्यानंतर कर्णधार उन्मुक्त चंद (४१) आणि सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. अराफात सनीने उन्मुक्तचा त्रिफळा उडवत बांगलादेश ‘अ’ संघाला दुसरे यश मिळवून दिले.
त्यानंतर रैना खेळपट्टीवर आला. गेल्या दोन सामन्यांत १६ व १७ धावांवर बाद झालेल्या रैनाने मिळालेल्या संधीचा लाभ घेतला. त्याने लिस्ट ए सामन्यांत सातवे वन-डे शतक ठोकले. दरम्यान, भारत ‘अ’ संघाची घसरगुंडी उडाली.
सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऋषी धवनने १५ चेंडूंना सामोेरे जाताना २६ धावांची खेळी केल्यामुळे भारताला ३०० धावांच्या आसपास मजल मारता आली. बांगलादेशतर्फे शफीउल इस्लाम सर्वांत यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ५६ धावांच्या मोबदल्यात २ बळी घेतले.
प्रत्युत्तरात खेळताना बांगलादेश संघाची सुरुवात निराशाजनक झाली. संघाची धावसंख्या २४ असताना त्यांचे आघाडीचे तीन फलंदाज तंबूत परतले होते. अरविंदने रोनी तालुकदार (९) आणि अनामुल हक (१) यांना बाद केले. त्यानंतर चायनामन गोलंदाज कुलदीपने बांगलादेशच्या फलंदाजांना सावरण्याची संधी दिली नाही.
गेल्या लढतीत शतकी खेळी करणारा नासिर हुसेन (२२) आज लवकरच बाद झाला. लिट्टन दासलाही (२१) मोठी खेळी साकारता आली नाही.
(वृत्तसंस्था)

धावफलक
भारत ‘अ’ : मयंक अग्रवाल झे. दास गो. शफीउल ०४, उन्मुक्त चंद त्रि. गो. सनी ४१, संजू सॅमसन त्रि. गो. अली अमीन ९०, सुरेश रैना झे. दास गो. रुबेल १०४, केदार जाधव यष्टिचित दास गो. नासिर ०४, गुरकिरत मान सिंग झे. तालुकदार गो. शफीउल ०४, ऋ षी धवन नाबाद २६, कर्ण शर्मा नाबाद ०१. अवांतर : (२३). एकूण : ५० षटकांत ६ बाद २९७. गोलंदाजी : शफीउल १०-०-५६-२, अल अमीन १०-२-५१-१, रुबेल १०-०-५९-१, सरकार ३-०-१९-०, सनी ९-०-५८-१, नासिर ८-०-४२-१.
बांगलादेश ‘अ’: सौम्या सरकार त्रि. गो. कुलकर्णी ०१, रोनी तालुकदार झे. धवन गो. अरविंद ०९, एनामुल हक झे. कुलदीप गो. अरविंद ०१, मोमिनुल हक झे. कुलकर्णी गो. कुलदीप ३७, लिट्टन दास झे. सॅमसन गो. कुलदीप २१, शब्बीर रहमान नाबाद ४१, नासिर हुसेन त्रि. गो. कर्ण शर्मा २२, अराफात सनी नाबाद ०२, अवांतर : (०७). एकूण : ३२ षटकांत ६ बाद १४१. गोलंदाजी : अरविंद ६-०-१४-२, कुलकर्णी ८-०-४५-१, ऋषी ३-०-२५-०, कर्ण ९-०-२८-१, कुलदीप ६-०-२९-२.

Web Title: India A's series win

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.