‘भारताने गोलंदाजांची हीच फळी कायम राखावी’
By admin | Published: January 13, 2015 02:32 AM2015-01-13T02:32:25+5:302015-01-13T02:32:25+5:30
आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ०-२ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागले;
सिडनी : आॅस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेत ०-२ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर भारतीय गोलंदाजांना टीकेला सामोरे जावे लागले; पण आॅस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज डेमियन फ्लेमिंग याने वर्तमान संघातील गोलंदाजांच्या गटाला कायम राखले, तर भारतीय संघाला प्रदीर्घ कालावधीसाठी लाभ मिळेल, असे मत व्यक्त केले आहे.
फ्लेमिंग म्हणाला, ‘‘माझ्या मते, गोलंदाजांच्या या गटाला शिकण्याची संधी देणे आवश्यक आहे. ईशांत शर्माच्या कामगिरीत सातत्य येत आहे. उमेश यादव व वरुण अॅरोन यांच्यामध्ये १४० किलोमीटर प्रतितास वेगाने मारा करण्याची क्षमता आहे. त्याचसोबत ते स्विंग मारा करण्यास सज्ज आहे. जगात अशी क्षमता असलेले गोलंदाज मोजके आहेत. त्यामुळे त्यांना अधिक संधी मिळायला हवी.’’
फ्लेमिंग पुढे म्हणाला, ‘‘मोहंमद शमी प्रभावी गोलंदाज आहे; पण तो अधिक वेगाने गोलंदाजी करीत नाही. तो चेंडू स्विंग करतो. भुवनेश्वरला स्विंग गोलंदाजीचे वरदान लाभले आहे. अनुकूल परिस्थितीमध्ये भारताकडे त्याला खेळविण्याचा पर्याय उपलब्ध आहे.’’
समालोचक झालेला फ्लेमिंग पुढे म्हणाला, ‘‘गोलंदाजांना कामगिरीत सातत्य राखता न आल्यामुळे संघाच्या रणनीतीवर प्रभाव पडतो. माझ्या मते, भारताचे गोलंदाज मानसिकदृष्ट्या कणखर नाहीत. त्यांच्या गोलंदाजीमध्ये परिपक्वता दिसत नाही. ते झटपट यश मिळविण्यास प्रयत्नशील असल्याचे दिसून येते. सध्याच्या क्रिकेटपटूंच्या पिढीमध्ये हे प्रामुख्याने दिसून येते. कसोटी क्रिकेटमध्ये धैर्य असणे गरजेचे असते आणि भारतीय गोलंदाजीमध्ये त्याचा अभाव दिसतो.’’
आॅस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय गोलंदाजांनी धावा बहाल तर केल्याच; पण त्याचसोबत त्यांना आॅस्ट्रेलियाच्या २० विकेट घेण्यात अपयश आले. पाहुण्या संघाच्या गोलंदाजांनी यजमान संघाच्या गोलंदाजांकडून धडा घ्यावा, असेही फ्लेमिंग म्हणाला.
फ्लेमिंगने पुढे सांगितले, की भारतीय गोलंदाजांना लेंथमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे. रॅन हॅरिसप्रमाणे आपल्याही चेंडूला टप्पा कसा असावा, याचा सराव करणे आवश्यक आहे. हॅरिस फलंदाजाला अधिकाधिक चेंडू खेळण्यास बाध्य करतो. भारतीय गोलंदाजांनी उजव्या यष्टिबाहेर मारा करण्याचे निश्चित करावे. भारतीय संघ मायदेशात सहज विजय मिळवितो; पण विदेशात विजय मिळविण्यासाठी त्यांना चांगली कामगिरी करणे शिकावे लागेल. आॅस्ट्रेलियासह विश्व क्रिकेटमधील सर्व संघ सध्याचा तसा प्रयत्न करीत आहेत. भारतीय गोलंदाजांनी सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या चौथ्या व अखेरच्या कसोटी सामन्यात चौथ्या दिवशी निराशाजनक कामगिरी केली. त्यांनी एका सत्रात २१३ धावा बहाल करताना प्रतिस्पर्धी आॅस्ट्रेलिया संघाला विजयाची संधी बहाल केली. (वृत्तसंस्था)