भारताने दोन फिरकीपटू खेळवावे
By admin | Published: June 11, 2017 12:34 AM2017-06-11T00:34:15+5:302017-06-11T00:34:15+5:30
श्री लंकेच्या भारतावरील विजयामुळे ‘ब’ गटात चुरस निर्माण झाली. त्याआधी द.आफ्रिकेने लंकेला नमविले होते. भारतानेही पाकला पराभूत केले तेव्हा फारशी
- सौरव गांगुली लिहितात...
श्री लंकेच्या भारतावरील विजयामुळे ‘ब’ गटात चुरस निर्माण झाली. त्याआधी द.आफ्रिकेने लंकेला नमविले होते. भारतानेही पाकला पराभूत केले तेव्हा फारशी चुरस पाहायला मिळाली नव्हती. पण बलाढ्य संघांविरुद्ध दोन्ही कमकुवत संघांनी तगडे आव्हान देत विजय मिळविताच ‘घड्याळाचे काटे उलटे फिरल्याचा’ भास झाला.
एखादा दिवस ज्या संघाचा असेल तोच जिंकतो. लंकेने भारताविरुद्ध ही गोष्ट सिद्ध करून दाखविली. आव्हाने असतील तर टॅलेंटही सिद्ध होत जाते. लंकेकडून गुणातिलका, कुसाल मेंडिस, कुसाल परेरा आणि गुणरत्ने या युवा खेळाडूंनी काळाची गरज ओळखून खेळी केली.
श्रीलंकेने या खेळाडूंची योग्य काळजी घेतल्यास भारतीय उपखंडात पुन्हा एकदा लंकेचा बलाढ्य संघ पुढे येऊ शकतो. प्रतिभावान असलेला अँजेलो मॅथ्यूज याने अगदी शांतचित्ताने विजयाची जबाबदारी स्वत:च्या खांद्यावर घेतली, हे विसरता येणार नाही. पाटा खेळपट्टीवर लंकेच्या फलंदाजांनी भारतीय मात्रा निष्प्रभ ठरविला. त्यांनी चौकार-षटकार तर मारलेच, पण धावफलक सतत हलता ठेवला. दीर्घकाळानंतर लंकेच्या युवा संघाकडून अशी अप्रतिम कामगिरी घडली. या युवा खेळाडूंनी धावांचा डोंगर सर केला तरी स्वत:वर दडपण येऊ दिले नाही. त्यातही युवा फलंदाज मेंडिसची खेळी शैलीदार होती.
या स्पर्धेच्या सुरुवातीपासून भारतीय संघात दोन फिरकीपटू खेळविण्याची मी सूचना करीत आलो आहे. भारताने पाकवर विजय नोंदविल्यानंतरही व्यवस्थापनाला मी दोन फिरकी गोलंदाज खेळविण्याचा आग्रह केला. इंग्लंडमधील खेळपट्ट्या पाटा आहेत. पावसानंतरही खेळपट्ट्यांचे स्वरूप फारसे बदलले नाही. माझ्या पूर्वानुभवानुसार भारताने अशा पाटा खेळपट्ट्यांवर दोन फिरकीपटू खेळवायलाच हवे. पाकिस्तानने द.आफ्रिकेच्या फलंदाजांना फिरकी माऱ्यात ज्याप्रकारे गुंतवून ठेवले ते डोक्यात ठेवून संघ निवडल्यास भारतीय फिरकीपटू त्यापेक्षा प्रभावीपणे प्रतिस्पर्धी फलंदाजांवर दडपण आणू शकतील.
इंग्लंड-आॅस्ट्रेलिया, पाक-श्रीलंका आणि भारत-द.आफ्रिका हे सर्व सामने ‘करा ंिकंवा मरा’ असेच आहेत. दुसऱ्या शब्दात उपांत्यपूर्व लढती असेही म्हणता येईल. भारताविरुद्ध सामन्यात द.आफ्रिका फलंदाजीत नेहमीच वरचढ ठरतो. याशिवाय रबाडा, मोर्केल, मॉरिस आणि पार्नेल असे दिग्गज गोलंदाज संघात आहेत. माझ्यामते इम्रान ताहिर मात्र निर्णायक भूमिका बजावेल. भारतीय फलंदाजांनी त्याच्यापासून सावध असावे.
भारताची फलंदाजी भक्कम आहेच. रोहित आणि धवन पुन्हा एकदा पाया मजबूत करू शकतील. त्यामुळे एखाद्या पराभवामुळे खचून जाण्याचे कारण नाही. संघाने पुन्हा आक्रमक खेळून विजयी वाटेवर परत यावे. मोठ्या सामन्यात विजय मिळविण्याचे तंत्र भारताला जमले असल्याने द.आफ्रिकेविरुद्ध विराट अॅन्ड कंपनी सरस कामगिरी करेल, असा मला विश्वास आहे.
जाताजाता बांगला देशचेदेखील न्यूझीलंडवरील विजयासाठी अभिनंदन करतो.या विजयामुळे बांगला देशने काहीही अशक्य नाही, हाच आत्मविश्वास अन्य संघात जागविला, असे म्हणायला हरकत नाही.(गेमप्लान)