भारत ‘अ’ची ‘श्रेयश’ फलंदाजी

By admin | Published: February 19, 2017 01:56 AM2017-02-19T01:56:28+5:302017-02-19T01:56:28+5:30

आॅस्टे्रलियाविरुद्ध सुरु असलेल्या तीनदिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत ‘अ’ संघाने अडखळती सुरुवात करताना ४ बाद १७६ धावांची मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा

India 'A' Shreyas' batting | भारत ‘अ’ची ‘श्रेयश’ फलंदाजी

भारत ‘अ’ची ‘श्रेयश’ फलंदाजी

Next

मुंबई : आॅस्टे्रलियाविरुद्ध सुरु असलेल्या तीनदिवसीय सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारत ‘अ’ संघाने अडखळती सुरुवात करताना ४ बाद १७६ धावांची मजल मारली. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईकर श्रेयश अय्यर (८५*) आणि दिल्लीचा रिषभ पंत (३*) खेळपट्टीवर होते. याआधी आॅस्टे्रलियाने फलंदाजीचा पुरेपूर सराव करुन घेताना आपला पहिला डाव ७ बाद ४६९ धावांवर घोषित केला होता.
सलामीवीर अखिल हेरवाडकरच्या (४) रूपाने भारत ‘अ’ संघाला पहिला धक्का बसला. यानंतर प्रियांक पांचाळ आणि श्रेयश अय्यर यांनी संघाचा डाव सावरला. फिरकीपटू नॅथन लियॉन याने पांचाळला (३६) बाद करुन ही जोडी फोडली. पांचाळ बाद झाल्यानंतर महाराष्ट्राचा अंकित बावणे (२५) आणि कर्णधार हार्दिक पंड्या (१९) फारशी चमक न दाखवता परतले.
परंतु, एका बाजूने खंबीरपणे उभा राहिलेल्या श्रेयशने दमदार फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. त्याने जबाबदारीपूर्वक फलंदाजी करताना ९३ चेंडंूत ७ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करीत नाबाद ८५ धावांची वेगवान खेळी केली. श्रेयशने आपल्या खात्यातील सगळे फटके मारताना आॅसी गोलंदाजीवर वर्चस्व मिळवण्यात यश मिळवले. विशेष म्हणजे, श्रेयशने एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे फटकेबाजी करताना ४४ चेंडंूत आपले अर्धशतक पूर्ण केले. परंतु, नंतर संघाला धक्के बसत राहिल्याने त्याने अतिधोक न पत्करता फटकेबाजीला काहीसा लगाम दिला. जॅक्सन बर्ड आणि लियॉन यांनी प्रत्येकी २ बळी घेत भारत ‘अ’ला फटकेबाजीपासून रोखले.
तत्पूर्वी, ५ बाद ३२७ धावांवरुन दुसऱ्या दिवसाची सुरुवात करताना आॅस्टे्रलियाने उपहारानंतर आपला पहिला डाव ७ बाद ४६९ धावांवर घोषित केला. कर्णधार स्टीव्ह स्मिथ (१०७) आणि शॉर्न मार्श (१०४) यांच्या शतकी खेळानंतर मिशेल मार्श आणि मॅथ्यू वेड यांनी अर्धशतक झळकावून संघाला मजबूत धावसंख्या उभारुन दिली. मार्शने १५९ चेंडंूत ११ चौकार व एका षटकारासह ७५ धावांची खेळी केली. तसेच, वेडने ८९ चेंडूत ९ चौकारांसह ६४ धावा काढल्या. भारत ‘अ’ कडून नवदीप सैनीने २, तर हार्दिक पंड्या, शाहबाज नदीम आणि अखिल हेरवाडकर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. (क्रीडा प्रतिनिधी)

श्रेयशचा धडाका...
मुंबईकरांच्या रक्तातच क्रिकेट असते हे पुन्हा एकदा श्रेयश अय्यरच्या खेळीने सिद्ध झाले. एका बाजूने फलंदाज तंबूत परतत असताना दुसरीकडे खंबीरपणे उभ्या असलेल्या श्रेयशने ‘वन डे’ स्टाईलने फटकेबाजी करत आॅस्टे्रलियाच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला.
जॅक्सन बर्डचा अपवाद वगळता ॉसीचा इतर एकही गोलंदाज श्रेयशला अडचणीत आणण्यात यशस्वी ठरला नाही. श्रेयशने आॅसीचा हुकमी गोलंदाज लियॉनला लाँग आॅनला षटकार ठोकून दिमाखात आपल्या खेळीला सुरुवात करत आॅस्टे्रलियाला इशारा दिला. दरम्यान, अर्धशतक झळकावल्यानंतर श्रेयशला
एक जीवदान नक्की मिळाले.

स्लेजिंगला सुरुवात...
श्रेयश अय्यर फलंदाजी करीत असताना यष्टीरक्षक मॅथ्यू वेड आणि आॅसीचा उपकर्णधार डेव्हीड वॉर्नर यांनी आपल्या ‘परंपरे’नुसार अय्यरला काहीप्रमाणात डिवचले. मात्र, अय्यरने यावर काहीही प्रतिक्रिया न देता आपला खेळ कायम ठेवला. याबाबत विचारले असताना अय्यर म्हणाला, ‘हे नेहमीचे आहे. भारत ‘अ’ संघाकडून आॅस्टे्रलिया दौऱ्यावर गेलेलो असताना त्यावेळेही स्लेजिंगचे प्रकार आॅस्टे्रलियन खेळाडूंकडून झाले होते. त्यामुळे याची आता सवय झाली आहे.’

धावसंख्या :
आॅस्टे्रलिया (पहिला डाव) : ५ बाद ३२७ धावांवरुन पुढे... मिशेल मार्श झे. बाबा इंद्रजित गो. नदीम ७५, मॅथ्यू वेड झे. पंत गो. हेरवाडकर ६४, ग्लेन मॅक्सवेल नाबाद १६, स्टीव्ह ओकीफे नाबाद ८. अवांतर - १४. एकूण : १२७ षटकात ७ बाद ४६९ धावा (घोषित).
गोलंदाजी : अशोक दिंडा २१.२-१-७८-०; हार्दिक पंड्या २२-३-८४-१; नवदीप सैनी १९.४-७-४२-२; शाहबाज नदीम ३३-१-१२६-१; अखिल हेरवाडकर १५-०-६४-१; श्रेयश अय्यर १२-०-५७-०; प्रियांक पांचाळ ४-०-११-०.
भारत ‘अ’ (पहिला डाव) : अखिल हेरवाडकर झे. व गो. लियॉन ४, प्रियांक पांचाळ झे. हँड्सकॉम्ब गो. लियॉन ३६, श्रेयश अय्यर खेळत आहे ८५, अंकित बावणे पायचीत गो. बर्ड २५, हार्दिक पंड्या झे. वेड गो. बर्ड १९, रिषभ पंत खेळत आहे ३. अवांतर - ४. एकूण : ५१ षटकात ४ बाद १७६ धावा.
गोलंदाजी : जॅक्सन बर्ड ११-७-१५-२; मिशेल मार्श ९-२-२६-०; नॅथन लियॉन १७-३-७२-२; स्टीव्ह ओकीफे १४-१-५९-०.

Web Title: India 'A' Shreyas' batting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.