पुणे शरीरसौष्ठवमय... ' भारत-श्री ' स्पर्धेत पीळदार स्नायूंचे प्रदर्शन पाहायला मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2018 07:00 PM2018-03-23T19:00:18+5:302018-03-23T19:00:18+5:30
या स्पर्धेत 600 पेक्षा अधिक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. खेळाडूंच्या आहारासाठी 1 लाख अंडी आणि 6 हजार किलो सोललेले चिकन मागविण्यात आले आहे.
मुंबई : ज्या क्षणाची अवघा देश आतुरतेने वाट पाहत होता तो क्षण आता दार ठोठावतोय. देशाच्या कानाकोपऱ्यातून शेकडो शरीरसौष्ठवपटूंचे ' भारत-श्री ' या स्पर्धेसाठी आगमन झाले असून पुणेकरांना पीळदार स्नायूंच्या खेळाडूंचे डोले शोले पाहाण्याचे वेध लागले आहेत. या स्पर्धेच्या निमित्ताने पुण्यामध्ये भारतातील दिग्गज आणि आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठवपटू दाखल झाले आहेत त्यामुळे वातावरण पूर्णपणे शरीरसौष्ठवमय झाले होते. शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच 50 लाखांपेक्षा अधिक रकमेची रोख बक्षीसे पीळदार स्नायूंच्या शरीरसौष्ठवपटूंना दिली जाणार आहेत.
एक लाख अंडी आणि 6 हजार किलो चिकन
' भारत-श्री ' या स्पर्धेत 600 पेक्षा अधिक खेळाडू आपले कौशल्य पणाला लावणार आहेत. खेळाडूंना यादरम्यान त्यांच्यासाठी सकस आहार पुरवणे हेसुद्धा एक मोठे आव्हान असते. त्याच्या आहारात मीठ, मसाला आणि तेल वर्ज्य असते. खेळाडूंच्या आहारासाठी 1 लाख अंडी आणि 6 हजार किलो सोललेले चिकन मागविण्यात आले आहे. हा फक्त खेळाडूंच्या तीन दिवसांचा सकस आहार असून फळांचीही सोय करण्यात आली आहे.
अव्वल शरीरसौष्ठवपटूंची ताकद दिसणार
या स्पर्धेसाठी विक्रमी संख्येने खेळाडू आज पुण्यात दाखल झाले. स्पर्धेत सर्वात बलाढ्य संघ महाराष्ट्राचाच आहे. हॅट्ट्रीकसाठी सज्ज असलेल्या सुनीत जाधवला आपले जेतेपद राखण्यासाठी सर्वस्व पणाला लावावे लागणार आहे. त्याला फक्त महाराष्ट्राबाहेरील खेळाडूंकडूनच आव्हान आहे, असे नाही तर महाराष्ट्राच्या महेंद्र पगडेकडूनही त्याला काँटे की टक्कर मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. महाराष्ट्राच्या संघात सागर कातुर्डे, नितीन म्हात्रे, महेंद्र चव्हाण, अक्षय मोगरकर आणि अतुल आंब्रे हे संभाव्य पदक विजेतेही खेळाडू आहेत. महाराष्ट्राची खरी लढाई रेल्वेच्या खेळाडूंशी रंगणार आहे. आंतररेल्वे स्पर्धेचा विजेता जावेद खान, राम निवास, किरण पाटील आणि सागर जाधव हे तयारीतले खेळाडू महाराष्ट्राला कडवे आव्हान देणार हे निश्चित आहे. तसेच केरळचा रियाझ टी.के., रशीद,दिल्लीचा मित्तल सिंग, नरेंदर, सीआरपीएफचा हरीराम आणि प्रीतम, पंजाब पोलीसांचा हिरालाल, सेनादलाचे अनुज, महेश्र्वरन आणि दयानंद सिंग यांच्या सहभागामुळे यंदाची स्पर्धा आणखी चुरशीची झाली आहे.