विंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघ जाहीर
By admin | Published: June 16, 2017 04:03 AM2017-06-16T04:03:32+5:302017-06-16T04:03:32+5:30
सिनिअर सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून, प्रतिभावान यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत व चायनामन
बर्मिंघम : सिनिअर सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला विंडीज दौऱ्यासाठी विश्रांती घेण्याचा सल्ला देण्यात आला असून, प्रतिभावान यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत व चायनामन गोलंदाज कुलदीप यादव यांना १५ सदस्यांच्या संघात स्थान देण्यात आले आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत संघात समावेश असलेला वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह यालाही पाच वन-डे व एका टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे.
ऋषभ व कुलदीप हे दोन खेळाडू चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी राखीव होते. एमएसके प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने या दोन युवा खेळाडूंना कमकुवत आंतरराष्ट्रीय संघाविरुद्ध संधी देण्याचा सकारात्मक निर्णय घेतला आहे. अनिल कुंबळे यांनी विंडीज दौऱ्यावर जाण्यास सहमती दर्शविली आहे, ही चांगली बाब ठरली आहे. हॅमस्ट्रिंग शस्त्रक्रियेनंतर पुनरागमन करणाऱ्या रोहितला संघ व्यवस्थापन सलग सामन्यांमध्ये खेळविण्याबाबत सावधगिरी बाळगत आहे. कारण यापूर्वी तो दीड महिना इंडियन प्रीमिअर लीगमध्ये खेळलेला असून चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतही खेळत आहे.
प्रत्येक लढतीपूर्वी रोहित फरहार्टसोबत चर्चा करताना दिसतो. रोहितच्या कमकुवत हॅमस्ट्रिंगवर फरहार्ट लक्ष ठेवून आहेत. भारतीय संघ व्यवस्थापन रोहितला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळविल्यानंतर विश्रांती देण्यास प्रयत्नशील होते.
त्याच्या शरीरावर अतिरिक्त दडपण येणार नाही, याची संघ व्यवस्थापन खबरदारी घेत आहे.
बुमराहबाबत बोलायचे झाल्यास आयपीएल सुरू झाल्यानंतर त्यावर मोठे दडपण आले. विंडीज दौऱ्याच्या निमित्ताने मोहम्मद शमीला काही चांगले सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. रोहित संघात नसल्यामुळे पंत सलामीवीर म्हणून पर्याय ठरू शकतो. पण अजिंक्य रहाणे शिखर धवनच्या साथीने डावाची सुरुवात करण्यासाठी दावेदार राहील. पंतला निश्चितच टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात संधी मिळेल. त्याचे यापूर्वीच आंतरराष्ट्रीय पदार्पण झालेले आहे.
चायनामन गोलंदाज कुलदीप यादवने आॅस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली होती.
त्याने श्रीलंकेविरुद्ध २०१४ च्या मालिकेत वन-डे संघात स्थान मिळवले होते, पण त्या वेळी त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. कुलदीप प्रदीर्घ कालावधीपासून प्रशिक्षक कुंबळे यांच्या पसंतीच्या खेळाडूंच्या यादीमध्ये आहे. (वृ्त्तसंस्था)
भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, अजिंक्य रहाणे, एम. एस. धोनी (यष्टिरक्षक), युवराज सिंह, केदार जाधव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार व कुलदीप यादव.