भारत ‘अ’चा दमदार विजय
By admin | Published: September 29, 2015 11:28 PM2015-09-29T23:28:49+5:302015-09-29T23:28:49+5:30
भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही बांगलादेश ‘अ’ संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारत ‘अ’ संघाने मंगळवारी संपलेल्या एकमेव अनधिकृत तीन दिवसीय कसोटी सामन्यात
बंगळुरू : भारत ‘अ’ संघाच्या गोलंदाजांनी दुसऱ्या डावातही बांगलादेश ‘अ’ संघाच्या फलंदाजांवर वर्चस्व गाजवले. भारत ‘अ’ संघाने मंगळवारी संपलेल्या एकमेव अनधिकृत तीन दिवसीय कसोटी सामन्यात बांगलादेशचा एक डाव ३६ धावांनी पराभव केला. कालच्या २ बाद ३६ धावसंख्येवरून पुढे खेळताना बांगलादेश ‘अ’ संघाचा दुसरा डाव ३९.३ षटकांत १५१ धावांत संपुष्टात आला. ईश्वर पांडे आणि जयंत यादव यांनी अनुक्रमे २८ व ४८ धावांच्या मोबदल्यात प्रत्येकी ३ बळी घेतले. अभिमन्यू मिथुनने २३ धावांच्या मोबदल्यात दोन बळी घेत त्यांना योग्य साथ दिली. भारत ‘अ’ संघाने पहिला डाव ५ बाद ४११ धावसंख्येवर घोषित केला होता. बांगलादेश ‘अ’ संघाचा पहिला डाव २२८ धावांत संपुष्टात आला होता. बांगलादेश संघापुढे भारताची पहिल्या डावातील आघाडी संपविण्याचे व चांगले लक्ष्य उभे करण्याचे आव्हान होते, पण बांगलादेश ‘अ’ संघावर डावाने पराभव स्वीकारण्याची नामुष्की ओढवली. बांगलादेशच्या केवळ पाच फलंदाजांना दुहेरी धावसंख्या नोंदवता आली. कर्णधार मोमिनुल हक (५४) आणि यष्टिरक्षक फलंदाज लिट्टन दास (३८) यांचे योगदान उल्लेखनीय ठरले. मोमिनुल व लिट्टन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ६१ धावांची भागीदारी केली. पांडेने लिट्टनला क्लिन बोल्ड करीत ही भागीदारी संपुष्टात आणली. दोन चेंडूंनंतर पांडेने पहिल्या डावातील शतकवीर शब्बीर रहमानला तंबूचा मार्ग दाखवत तिसरा बळी घेतला. पांडेने सोमवारी सलामीवीर अनामुल हक (०) याला बाद केले होते.
मिथुनने त्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला दुहेरी धक्का दिला. पहिल्या चेंडूवर नासीर हुसेनला (१०) बाद केल्यानंतर होम याला २३ व्या षटकातील पाचव्या चेंडूवर यादवकडे झेल देण्यास भाग पाडले. त्या वेळी बांगलादेशची ६ बाद ८७ अशी अवस्था झाली होती. मोमिनुलने त्यानंतर सकलेन साजिब (२१) याच्यासोबत ३३ धावांची भागीदारी केली.(वृत्तसंस्था)
------------
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका अत्यंत अटीतटीची व रोमांचक होईल. घरच्या वातावरणाचा टीम इंडियाला फायदा मिळेल. मात्र या वातावरणाचा फायदा उचलण्यात यशस्वी ठरल्यास निश्चित या मालिकेत टीम इंडिया विजयी होईल.
- शिखर धवन
----------
धावफलक
बागंलादेश पहिला डाव : २२८. भारत ‘अ’ पहिला डाव : ५ बाद ४११ (डाव घोषित); बांगलादेश दुसरा डाव : अनामुल हक झे. नायर गो. पांडे ०, सौम्या सरकार झे. नायर गो. यादव १९, मोमिनुल हक झे. जडेजा गो. यादव ५४, लिट्टन दास त्रि. गो. पांडे ३८, शब्बीर रहमान पयाचित गो. पांडे ०, नासीर हुसेन त्रि. गो. मिथुन १, एस. होम झे. यादव गो. मिथुन ०, सकलेन साजीब झे. अय्यर गो. यादव २१, शफीउल इस्लाम नाबाद १३, जुबेर हुसेन यष्टिचित ओझा गो. जडेजा १, रुबेल हुसेन (अनुपस्थित). अवांतर (४). एकूण ३९.३ षटकांत सर्व बाद १५१. बाद क्रम : १-४, २-२१, ३-८२, ४-८२, ५-८७, ६-८७, ७-१२०, ८-१५०, ९-१५१. गोलंदाजी : पांडे १०-३-२८-३, मिथुन ७-२-२३-२, यादव १२-१-४८-३, जडेजा ६.३-१-२७-१, अॅरोन ४-१-२४-०.