उज्बेकिस्तानवर भारताची २-० आघाडी
By admin | Published: April 8, 2017 12:41 AM2017-04-08T00:41:41+5:302017-04-08T00:41:41+5:30
रामकुमार रामनाथन व प्रग्नेश गुणेश्वरन यांनी आपापल्या एकेरीच्या लढतींमध्ये विजय मिळवत भारताला डेव्हीस कप आशिया-ओशियाना गटातील लढतीमध्ये उज्बेकिस्तानविरुद्ध २-० अशी आघाडी मिळवून दिली
बेंगळुरू : रामकुमार रामनाथन व प्रग्नेश गुणेश्वरन यांनी आपापल्या एकेरीच्या लढतींमध्ये विजय मिळवत भारताला डेव्हीस कप आशिया-ओशियाना गटातील लढतीमध्ये उज्बेकिस्तानविरुद्ध २-० अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या लढतीत २६७ वे मानांकन असलेल्या रामनाथनने तैमूर इसमाइललोव्हचा ६-२, ५-७, ६-२, ७-५ ने पराभव केला तर १८७ वे मानांकन असलेल्या गुणेश्वरनने संजार फेजियेबवर ७-५, ३-६, ६-३, ६-४ ने मात केली.
इसमाइलोव्हच्या पायाचा स्नायू दुखावला होता, पण तरी त्याने रामकुमारविरुद्ध शानदार लढत दिली. रामकुमारला पहिला सेट जिंकण्यात कुठली अडचण आली नाही. दुसऱ्या सेटमध्येही रामकुमार ४-३ ने आघाडीवर होता, पण त्यानंतर इसमाइलोव्हने ०-४० च्या स्कोअरवर तीन ब्रेक पॉर्इंट दिले. रामकुमारने दोन ब्रेक पॉर्इंटचा बचाव केला, पण तिसऱ्या पॉर्इंटला बॅकहँड नेटमध्ये गेल्यामुळे त्याने सर्व्हिस गमावली. उज्बेकिस्तानच्या खेळाडूने त्यानंतर रामकुमारवर वर्चस्व गाजवित सेट जिंकला आणि १-१ अशी बरोबरी साधली. रामकुमारने १२ व्या गेममध्ये चार सेट पॉर्इंट गमावले आणि सर्व्हिसही गमावली.
इसमाइलोव्हला तिसऱ्या सेटमध्ये पायाच्या दुखापतीला सामोरे जावे लागले. त्याचा रामकुमारला लाभ मिळाला. मेडिकल टाइम आऊटनंतर इसमाइलोव्हने दमदार पुनरागमन केले आणि चौथ्या सेटमध्ये आव्हान देण्यास सज्ज झाला. एकवेळ उभय खेळाडू ५-५ ने बरोबरीत होते. इसमाइलोव्हने त्यानंतर दोन सहज चुका केल्या. त्यामुळे रामकुमारला तीन ब्रेक पॉर्इंट मिळाले. रामकुमारने तिसऱ्या ब्रेक पॉर्इंटवर गुण वसूल केला. रामकुमारने त्यानंतर मॅच पॉर्इंटवर दोन दुहेरी चुका केल्या, पण फोरहँडच्या जोरकस फटक्यावर गुण वसूल करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
एकेरीच्या दुसऱ्या लढतीत गुणेश्वरनने पहिला, तिसरा व चौथा सेट जिंकला. दुसऱ्या सेटममध्ये गुणेश्वरन १-४ ने पिछाडीवर होता. उज्बेकिस्तानच्या खेळाडूने हा सेट जिंकत १-१ अशी बरोबरी साधली. तिसऱ्या सेटममध्ये गुणेश्वरनने अनेक चुका केल्यामुळे फेजियेव्हने ३-१ ने आघाडी घेतली होती. गुणेश्वरनने दमदार पुनरागमन करीत ४-३ अशी आघाडी घेतली. त्याने तिसरा सेट जिंकला व चौथ्या सेटमध्ये ६-४ बाजी मारत विजयावर शिक्कामोर्तब केले. या लढतीतील विजेता संघ विश्व ग्रुप प्ले आॅफसाठी पात्र ठरणार आहे.