भारत अ संघाचे रौप्य पदकावर समाधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 12:07 AM2018-04-23T00:07:48+5:302018-04-23T00:07:48+5:30
चुरशीच्या झालेल्या लढतीत फ्रान्स संघाचा ३-२ गेममध्ये पराभव करून ७ व्या जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच रौप्यपदक जिंकले.
पुणे : भारतीय मुलांच्या अ संघाने सिलेक्टेड टीम प्रकारात रविवारी शेवटच्या साखळी लढतीत चुरशीच्या झालेल्या लढतीत फ्रान्स संघाचा ३-२ गेममध्ये पराभव करून ७ व्या जागतिक शालेय बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत प्रथमच रौप्यपदक जिंकले. फ्रान्सविरूध्द झालेल्या सामन्याचे शिल्पकार तरूण मन्नेपल्ली, वरून त्रिखा ठरले. चिनी तैपई संघाने सुवर्णपदकावर आपला हक्क प्रस्तापित केला.
क्रीडा व युवक सेवासंचालनालय, महाराष्टÑ शासनाच्यावतीने म्हाळुंगे-बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरू असलेल्या स्पर्धेत रविवारी झालेल्या गटातील अखेरच्या लढतीत भारताने फ्रान्सवर ३-२ गेमने विजय मिळवित सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला. दुहेरीच्या पहिल्या लढतीत केन्जी लोव्हँग-विलियम व्हिलेगर जोडीने रितूपर्णा बोरा-पारस माथूर जोडीवर २१-१३, २३-२१ गुणांनी मात करून फ्रान्सला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुसऱ्या दुहेरीत तरुण मन्नेपल्ली-वरुण त्रिखा जोडीने ५४ मिनिटे झालेल्या लढतीत मार्टिन क्वाझेन-लैलना राहरी जोडीवर १६-२१, २६-२४, २१-१९ गुणांनी विजय मिळवित भारताला १-१ अशी बरोबरी साधून दिली. त्यानंतर एकेरीत तरुणने लेओवर २१-१७, १७-२१, २१-७ गुणांनी संघर्षपूर्ण विजय मिळवला आणि भारताला २-१ अशी आघाडी मिळवून दिली. नंतर एक तास चाललेल्या लढतीत वरुणने मार्टिनवर १७-२१, २७-२५, २१-१५ गुणांनी विजय मिळवला आणि भारताला ३-१ अशी स्थिती केली. वरुणने पराभवाच्या उंबरठ्यावरवरून विजय खेचून आणला. वरुणने पहिला गेम गमावल्यानंतर दुस-या गेममध्ये सुरुवातीपासूनच दोघांमध्ये प्रत्येक गुणासाठी चुरस बघायला मिळाली. यानंतर २५-२५ अशी बरोबरी असताना वरुणने सलग दोन गुण घेत बाजी मारली आणि आपले आव्हान राखले. आत्मविश्वास उंचावलेल्या वरुणने निर्णायक गेममध्ये मार्टिनला संधीच दिली नाही. यानंतर एकेरीतील अखेरच्या लढतीत विलियमने मोनिमुग्धा राजकंवरला २१-१२, १५-२१, २१-१४ असे पराभूत केले, पण त्याचा निकालावर काही परिणाम झाला नाही.
भारत ब संघाचा पराभव....
मुलांच्या गटात भारत ब संघाला ब्राझीलकडून ०-५ गेमने पराभव पत्करावा लागला. यात दुहेरीत पेड्रो टिटो-थिअॅगो मोझेर जोडीने मिहिर-नमराज जोडीवर २-० अशी, तर लुकास सिल्वा-मॉईसेस लिमा जोडीने अभिनव-अर्णव जोडीवर २-० अशी मात करून ब्राझीलला २-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर एकेरीत थिअॅगोने मिहिरला सहज पराभूत करून ब्राझीलला विजयी आघाडी मिळवून दिली. यानंतर पेड्रोने मिहिरला, तर मॉइसेसने अभिनवला पराभूत केले.
सिलेक्टेड टीम प्रकारात मुलांच्या गटात एकूण सात संघ होते. यात चिनी तैपेईने गटातील सहाच्या सहा लढती जिंकून १२ गुणांसह विजेतेपद संपादन केले. भारत अ संघाने सहा पैकी पाच लढती जिंकून १० गुणांसह उपविजेतेपदावर कब्जा केला. भारतीय अ संघाला गटातील लढतीत चिनी तैपेईकडून १-४ गेमने पराभव पत्करावा लागला. मात्र भारत अ संघाने चीनला ४-१, ब्राझीलला ५-०, यूएईला ५-०, भारत ब संघाला ५-० व फ्रान्सला ३-२ गेममध्ये पराभूत केले.