भारताने घेतली २८५ धावांची आघाडी

By admin | Published: August 13, 2016 05:59 AM2016-08-13T05:59:26+5:302016-08-13T05:59:26+5:30

भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक स्विंग माऱ्याच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशी यजमान वेस्ट इंडिजला २२५ धावात गुंडाळून दिवसअखेर २८५ धावांची शानदार आघाडी घेतली.

India took the lead 285 runs | भारताने घेतली २८५ धावांची आघाडी

भारताने घेतली २८५ धावांची आघाडी

Next

ऑनलाइन लोकमत

ग्रोस इसलेट, दि. १३  -  भुवनेश्वर कुमारने केलेल्या भेदक स्विंग माऱ्याच्या जोरावर भारताने चौथ्या दिवशी यजमान वेस्ट इंडिजला २२५ धावात गुंडाळून दिवसअखेर २८५ धावांची शानदार आघाडी घेतली. भुवनेश्वरने ३३ धावात ५ बळी घेत विंडिजचे कंबरडे मोडले. सलामीवीर क्रेग ब्रेथवेटच्या (६४) अर्धशतकाच्या जोरावर यजमानांनी दमदार कूच केली होती.

चौथ्या दिवशी केएल राहुल २८  धावांवर बाद झाला. शिखर धवन २६ धावा काढून पायचित झाला, तर विराट कोहली अवघ्या ४ धावा काढून तंबूत परतला. भारताच्या दिवसअखेर ३९ षटकात तीन बाद १५७ धावा झाल्या. रहाणे (५१) आणि रोहित शर्मा (४१) खेळत आहेत.

तिसऱ्या दिवशी पावसामुळे एकही चेंडूचा खेळ न झाल्यानंतर चौथ्या दिवशी विंडिजने १ बाद १०७ धावांवरुन खेळण्यास सुरुवात केली. ब्रेथवेट - डॅरेन ब्रावो ही जमलेली जोडी भारताला झुंजवणार असे दिसत असतानाच, इशांत शर्माचा आखूड टप्प्याचा चेंडू हुक करण्याचा प्रयत्न चुकल्याने ब्रावो झेलबाद होऊन परतला. ब्रावोने १०१ चेंडूत ३ चौकारांसह २९ धावा काढल्या. त्याने ब्रेथवेटसह दुसऱ्या विकेटसाठी ७० धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.
ब्रेथवेटला अश्विनने बाद करुन भारताला तिसरे यश मिळवून दिले. त्याने १६३ चेंडूत ६ चौकारांसह ६४ धावा फटकावल्या. यावेळी भारत आपली पकड मजबूत करणार अशी चिन्हे होती. मात्र अनुभवी मार्लोन सॅम्युअल्स (४८) आणि जेरमेन ब्लॅकवूड (२०) यांनी विश्रांतीपर्यंत भारताला यश मिळू दिले नाही.
यानंतर मात्र भुवनेश्वरने सामन्याचे चित्रच पालटले. आपल्या भेदक स्विंग माऱ्याच्या जोरावर त्याने ब्लॅकवूड, शेन डॉर्विच (१८), कर्णधार जेसन होल्डर (२), अलझारी जोसेफ (०) यांना बाद केले. अवघ्या १० धावांत ४ बळी गमावल्याने विंडिजची ४ बाद २०२ धावांवरुन ८ बाद २१२ अशी अवस्था झाली. यानंतर कमिन्स आणि डॉर्विचही झटपट परतल्याने यजमानांचा डाव संपुष्टात आला. भुवनेश्वरने केलेल्या अचूक गोलंदाजीला फिरकीपटू आर. अश्विनने पुरेपुर साथ दिली. त्याने ५२ धावात २ बळी घेतले. तर इशांत शर्मा, रविंद्र जडेजा यांनी प्रत्येकी १ बळी घेतले. 

 

Web Title: India took the lead 285 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.