भारत अव्वलस्थानी, विश्वचषक नेमबाजी; स्मित सिंग १५ व्या स्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2018 04:25 AM2018-03-13T04:25:29+5:302018-03-13T04:25:29+5:30
आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) आयोजित विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एकही पदक जिंकले नाही.
नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय नेमबाजी महासंघ (आयएसएसएफ) आयोजित विश्वचषक नेमबाजी अजिंक्यपद स्पर्धेत शेवटच्या दिवशी भारतीय नेमबाजांनी एकही पदक जिंकले नाही. मात्र असे असले तरी या स्पर्धेत भारतीय संघ पदकतालिकेत चार सुवर्ण, एक रौप्य आणि चार कांस्य पदकांसह अव्वल क्रमांकावर राहिला. या स्पर्धेत प्रथमच एकूण नऊ पदाकांसह भारतीय नेमबाजांनी बाजी मारली आहे.
सोमवारी पुरुषांच्या स्किट प्रकारात दोन वेळा आॅलिम्पिक विजेता अमेरिकेच्या व्हिन्सेंट हैनकॉकने पात्रता फेरीत १२५ पैकी १२३, तर अंतिम फेरीत ६० पैकी ५९ गुणांचे लक्ष्य साधून जागतिक विक्रमाची बरोबरी केली. आॅस्ट्रेलियाच्या पॉल एडम्सने व्हिन्सेंटच्या गुणांची बरोबरी साधली; पण शूटआॅफमध्ये हैनकॉकने एडम्सचा ६-५ गुणांनी पराभव केला. इटलीच्या ताम्मारो कास्सांद्रोला अंतिम फेरीत ४९ गुणांसह कांस्यपदावर समाधान मानवे लागले. या प्रकारात पात्रता फेरीत भारताच्या स्मित सिंगला ११६ गुणांसह १५ व्या क्रमांकावर राहावे लागले.
स्पर्धेत भारताच्या शाहजार रिजवी, मनू भाकर, अखिल शेरॉन व ओम प्रकाश मिथार्वल यांनी आपापल्या गटात सुवर्णपदक जिंकले होते. अंजुम मौदगिलने रौप्य, तर जितू राय व रवीकुमारला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. (वृत्तसंस्था)