भारताचा थायलंडवर विजय
By Admin | Published: February 8, 2017 11:45 PM2017-02-08T23:45:40+5:302017-02-08T23:45:40+5:30
मध्यमगती गोलंदाज मानसी जोशीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने आज येथे थायलंड संघावर २२४ चेंडू आणि ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला.
कोलंबो : मध्यमगती गोलंदाज मानसी जोशीच्या नेतृत्वाखालील गोलंदाजांनी केलेल्या सुरेख कामगिरीच्या बळावर भारतीय महिला संघाने आज येथे थायलंड संघावर २२४ चेंडू आणि ९ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. सामन्यातील सर्वोत्तम खेळाडू ठरलेल्या मानसीने ५ षटकांत ४ धावा देत ३ गडी बाद केले. तिला दीप्ती शर्मा, पूनम यादव आणि राजेश्वरी गायकवाड यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली. या गोलंदाजांच्या कामगिरीच्या बळावर भारताने प्रथम फलंदाजी करणाऱ्या थायलंड संघाचा २९.१ षटकांत ५५ धावांत खुर्दा उडवला.
थायलंडकडून फक्त दोनच फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले. भारताने विजयी लक्ष्य अवघ्या १२.४ षटकांतच १ गडी गमावून ५९ धावा करीत गाठले. सलामीची फलंदाज तिरुष कामिनीने २४ आणि वेदा कृष्णमूर्तीने नाबाद १७ धावा केल्या. हरमनप्रीत कौरने १५ धावांचे योगदान दिले. भारताचा अ गटातील हा सलग दुसरा विजय ठरला. याआधी त्यांनी पहिल्या सामन्यात श्रीलंकेवर ११४ धावांनी मात केली होती. भारताचे दोन सामन्यांत चार गुण झाले असून, ते अ गटात अव्वल स्थानी आहेत.