भारत असुरक्षित, तू जाऊ नकोस; स्क्वॉश खेळाडूच्या पालकांनी मुलीला थांबवलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2018 03:36 PM2018-07-21T15:36:54+5:302018-07-21T15:37:13+5:30
जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेली अॅम्ब्रे अॅलिंचक्स हीने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात न येण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई - जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा आयोजनाचा मान भारताला मिळाला आहे. चेन्नईत 17 जुलैपासून सुरू झालेल्या या स्पर्धेत 28 देशांचे खेळाडू व अधिकारी दाखल झाले आहेत. मात्र, स्वित्झर्लंडच्या ताफ्यात एका नावाची उणीव प्रकर्षाने जाणवत आहे. जागतिक क्रमवारीत आघाडीवर असलेली अॅम्ब्रे अॅलिंचक्स हीने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात न येण्याचा निर्णय घेतला आहे.
भारतात महिला अत्याचाराच्या वाढत असलेल्या घटनांमुळे अॅलिंचक्सच्या पालकांनी तिला भारतात जाण्याची परवानगी दिली नसल्याचे वृत्त एका इंग्रजी वृत्तपत्राने प्रसिद्ध केले होते. स्वित्झर्लंड संघाचे प्रशिक्षक पॅस्कल भुरीन यांनी सांगितले की, अॅम्ब्रे अॅलिंचक्स ही अव्वल क्रमांकाची खेळाडू आहे. पालकांनी तिला भारतात येण्याची परवानगी दिली नसल्याने ती या स्पर्धेत सहभागी झालेली नाही. भारतात महिला अत्याचाराच्या घटनांबद्दल त्यांनी इंटरनेटवर वाचले होते आणि त्यामुळे त्यांनी मुलीच्या बाबतीत धोका न पत्करण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान खेळाडूंना येथे असुरक्षित वाटलेले नाही. इराण, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेने या संदर्भात चिंता व्यक्त केली होती. जागतिक स्क्वॉश फेडरेशननेही अॅलिंचक्सच्या पालकांच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.