भारत आणि इंग्लंड सामना, विजयी संघाला मिळणार 12 गुण
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2021 05:08 AM2021-07-01T05:08:49+5:302021-07-01T05:09:21+5:30
भारत-इंग्लंड मालिकेद्वारे डब्ल्यूटीसीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार सुरुवात
नवी दिल्ली : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला आगामी भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या मालिकेद्वारा सुरुवात होणार आहे. दोन वर्षे चालणाऱ्या या दुसऱ्या चॅम्पियनशिपदरम्यान विजयी संघाला १२ गुण दिले जातील, अशी घोषणा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने बुधवारी केली.
सामना ‘टाय’ झाल्यास दोन्ही संघांना सहा - सहा गुण मिळतील, तर अनिर्णित सुटल्यास चार - चार गुण दिले जातील. आयसीसीचे अंतरिम सीईओ ज्योफ अलार्डिस यांनी काही दिवसांआधी गुणपद्धतीत बदल करण्याचे संकेत दिले होते. आयसीसी बोर्डाच्या सदस्याने वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन किंवा पाच सामने असले तरी, याआधी प्रत्येक मालिकेसाठी १२० गुण असायचे. दुसऱ्या टप्प्यात मात्र प्रत्येक सामन्यासाठी गुण असतील.
डब्ल्यूटीसीचा दुसरा टप्पा जून २०२३ ला संपणार असून त्यात भारत - इंग्लंड मालिकेसह पाच सामन्यांच्या ॲशेस मालिकेचा देखील समावेश असेल. पुढच्यावर्षी ऑस्ट्रेलिया संघ भारत दौऱ्यात चार कसोटी सामने खेळणार आहे. सर्व नऊ संघांपैकी प्रत्येक संघ एकूण सहा मालिका खेळेल. त्यातील तीन मायदेशात, तर तीन प्रतिस्पर्धी संघांच्या देशात खेळाव्या लागतील. मागच्या टप्प्यात अशाच पद्धतीने सामने आयोजित झाले होते.
डब्ल्यूटीसीच्या पहिल्या टप्प्यातील अंतिम सामन्यात न्यूझीलंडने भारताचा पराभव करीत जेतेपदावर नाव कोरले. ईएसपीएन क्रिकइन्फोनुसार दुसऱ्या टप्प्यात इंग्लंड संघ सर्वाधिक २१ कसोटी सामने खेळेल. त्यापाठोपाठ भारतीय संघ १९, ऑस्ट्रेलिया १८ आणि द. आफ्रिका १५ सामने खेळणार आहे. न्यूझीलंड आणि श्रीलंका संघ प्रत्येकी १३-१३, तर पाकिस्तान संघ १४ कसोटी सामने खेळणार आहे.
n एका सामन्यासाठी जास्तीत जास्त १२ गुण मिळू शकतील. संघांनी सामने खेळून जे गुण संपादन केले, त्या गुणांच्याआधारे क्रमवारी देखील निश्चित केली जाईल. आगामी काही आठवड्यांत आयसीसी सीईओंच्या बैठकीत बदललेल्या गुणतालिकेला मंजुरी प्रदान केली जाईल.
n बोर्डाच्या एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, गुणपद्धतीला सोपे करण्याचा प्रयत्न असेल. संघ वेगवेगळ्या संख्येने सामने किंवा मालिका खेळले तरी, गुणांच्या आधारे त्यांची तुुलना सोपी व्हावी.
भारताच्या मालिका ६
मायदेशात ३
विदेशात ३
एकूण सामने: १९
मायदेशातील मालिका
प्रतिस्पर्धी वर्ष सामने
न्यूझीलंड नोव्हेंबर २०२१ २
श्रीलंका फेब्रुवारी २०२२ ३
ऑस्ट्रेलिया नोव्हेंबर २०२२ ४
विदेशातील मालिका
प्रतिस्पर्धी वर्ष सामने
इंग्लंड ऑगस्ट २०२१ ५
द. आफ्रिका डिसेंबर २०२१ ३
बांगला देश नोव्हेंबर २०२२ २