भारत-बांगलादेश सामना ठरला विक्रमांचा
By Admin | Published: June 19, 2015 11:36 PM2015-06-19T23:36:55+5:302015-06-19T23:36:55+5:30
बांगलादेशने भारतावर ७९ धावांनी दणदणीत विजय मिळवित एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. मात्र हा सामना दोनही संघांसाठी एका अर्थाने विक्रमांचा ठरला आहे.
मिरपूर : बांगलादेशने भारतावर ७९ धावांनी दणदणीत विजय मिळवित एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत आघाडी घेतली आहे. मात्र हा सामना दोनही संघांसाठी एका अर्थाने विक्रमांचा ठरला आहे. भारतीय सलामीच्या जोडीची भागीदारी, बांगलादेशाने पार केलेला तीनशे धावांचा टप्पा व पदार्पणातच ५ गडी बाद करणारा बांगलादेशाचा गोलंदाज असे विक्रम या सामन्यात पाहायला मिळाले.
बांगलादेशाने भारताविरुद्ध ठोकलेल्या ३०७ धावा ही आतापर्यंतची सर्वोच्च धावसंख्या ठरली आहे. यापूर्वी २०१० मध्ये बांगलादेशाने ढाका येथे झालेल्या सामन्यांत २९६ धावा ठोकल्या होत्या. गेल्या आठ सामन्यांपैकी ७ सामन्यांत बांगलादेशाने अडीचशेच्या वर धावा काढूनही त्यांना सामन्यांत हार पत्करावी लागली होती.
या सामन्यात भारतीय फलंदाजांना पाणी पाजणाऱ्या मुस्तफिजुर रहमान याने एकदिवसीय सामन्यात पदार्पणातच ५० धावांच्या मोबदल्यात भारताचे ५ गडी तंबूत धाडले. अशी कामगिरी करणारा तो बांगलादेशाचा दुसरा गोलंदाज ठरला आहे.