भारत वि. पाकिस्तान : क्रिकेट नव्हे मैदान ए जंग !
By admin | Published: June 18, 2017 08:15 AM2017-06-18T08:15:05+5:302017-06-18T09:34:12+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ समोर असल्याने सामन्याला अधिकच महत्त्व आलंय. अगदी जे क्रिकेटचे नियमित प्रेक्षक नाहीत,अशांनीही वेळात वेळ काढलाय.
Next
>- बाळकृष्ण परब/ ऑनलाइन लोकमत
अखेर आज तो दिवस उजाडला, ज्या दिवसाची सव्वाशे कोटी भारतीय क्रिकेटप्रेमी गेल्या पंधरवड्यापासून प्रतीक्षा होती. आज होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीत भारतीय संघ जेतेपद राखण्यासाठी ओव्हलच्या मैदानात उतरेल. त्यात अंतिम लढतीत कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा संघ समोर असल्याने सामन्याला अधिकच महत्त्व आलंय. अगदी जे क्रिकेटचे नियमित प्रेक्षक नाहीत, अशांनीही वेळात वेळ काढलाय. देवांना नवससायास बोलणे सुरू आहे. मीडिया आणि सोशल मीडियावर दोन्ही संघांचे समर्थक एकमेकांवर शेलक्या भाषेत शरसंधान करताहेत. एकंदरीत सामन्यासाठी जबरदस्त माहौल तयार झालाय. त्यामुळेच की काय दोन्ही देशांच्या क्रिकेट संघांमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम लढतीला महायुद्ध, मैदान ए जंगचं स्वरूप आलं आहे. पाकिस्तानचा आपल्यासोबतचा राजकीय इतिहास, तणावाचे संबंध यामुळे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा कधीच खेळ राहत नाही. तर ते असते मैदानावरील युद्ध. हे आज नाही गेल्या 65 वर्षांपासून सुरू आहे. अगदी सुरुवातीच्या काळात कसोटी क्रिकेटच्या युगात तर दोन्ही संघ पराभवाची नामुष्की नको म्हणून सामना अनिर्णित कसा राहील, याची खबरदारी घेत. मध्यंतरीच्या काळात एकदिवसीय सामन्यांचे प्रमाण वाढल्यावर मात्र पाकिस्तानी संघ आपल्याला वरचढ ठरला होता. पण गेल्या 15 - 20 वर्षांत आपण त्या पराभवांचा बॅकलॉग बऱ्यापैकी भरून काढलाय. ताणलेल्या राजकीय संबंधांमुळे दोन्ही संघांमधील द्विपक्षीय मालिका पूर्णपणे बंद झाल्यात, भारतीय संघाने संधी मिळेल तिथे पाकिस्तानला झोडपण्याचा धडाका लावलाय.
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याचा आम्ही फार दबाव घेणार नाही. इतर सामन्यांसारखाच खेळ करू, असे भारताचा विराट कोहली म्हणालाय, पण वस्तुस्थिती काय आहे, विराटलाही माहित आहे. या सामन्यातील चांगल्या किंवा वाईट कामगिची आठवण क्रिकेटप्रेमींच्या मनात, हृदयात आणि इतिहासाच्या पानात कायमची कोरली जाऊ शकते, याचीही जाणीव दोन्ही बाजूच्या खेळाडूंना आहे. म्हणूनच शारजात जावेद मियाँदादने शेवटच्या चेंडूवर चेतन शर्माला मारलेला षटकार आठवला की भारताती क्रिकेटप्रेमींच्या काळजात धस्स होते. तर मिसबाचा झेल टिपून भारतीय संघाने साजरे केलेल्या पहिल्यावहिल्या ट्वेंटी-20 विश्वचषकाला घातलेली गवसणी आठवली की अभिमानाने उर भरून येतो. त्यामुळेच की काय काळ बदलला तरी दोन्ही देश आणि त्यांच्या संघांमधील हे द्वंद्व आजही तेवढ्याच ईर्षेने खेळले जाते.
आज लंडनमधील ओव्हलचे मैदनही दोन्ही संघांमधील महायुद्धाची रणभूमी होणार आहे. या संग्रामासाठी दोन्ही संघ सज्ज झालेत. नशिबाची साथ आणि उत्तरोत्तर उंचावलेला खेळ याच्या जोरावर अंतिम फेरीत धडक मारणारा पाकिस्तानी संघ आज भारताला धक्का देण्यासाठी इच्छुक असेल. त्यांच्याकडे अझहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, कर्णधार सर्फराझ अहमद तर गोलंदाजीत मोहम्मह आमीर असा तगडा फौजफाटा आहे. त्यामुळे त्यांच्याकडून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. पण विराटसेनाही सध्या उत्साहाने भारलेली आहे. आघाडीच्या फळीत रोहित शर्मा, शिखर धवन आणि विराट कोहली या त्रिदेवांचा जबरदस्त फॉर्म, त्यांना मधल्या फळीत युवराज, धोनी आणि केदार जाधव यांच्याकडून मिळणारी सुरेख साथ, इंग्लंडच्या वातावरणात बहरलेली गोलंदाजी यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानी संघाच्या आव्हानाची फारशी फिकिर नसेल. त्यातच 2007 साली ट्वेंटी-20 विश्वचषकाच्या अंतिम लढतीत पाकिस्तानविरुद्ध खेळलेले महेंद्रसिंग धोनी, युवराज सिंग आणि रोहित शर्मा असे खेळाडू भारतीय संघात आहेत, त्यांच्या अनुभवही कामी येईल. मैदानात उतरल्यावर थोडी खबरदारी घेतली तरी रात्री चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्या हाती असेल. बाकी पाकिस्तानविरुद्ध खेळण्याची संधी आपल्याला अधुनमधून मिळत राहील. पण पाकिस्तानला जागतिक स्पर्धेच्या अंतिम लढतीत लोळवण्याचा "मौका" कधीतरीच मिळतो. विराटसेनेने संधीचे सोने करावे हीच भारतीय संघाच्या पाठीराख्यांची अपेक्षा असेल. तेव्हा मिला है मौका मार दो चौका!