दुसऱ्या दिवसाखेर भारत 52 धावांनी पिछाडीवर

By admin | Published: March 26, 2017 05:19 PM2017-03-26T17:19:07+5:302017-03-26T18:36:22+5:30

पहिल्या डावात कांगारूंनी दिलेल्या 300 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दुस-या दिवशी संयमी फंलदाजी केली.

India were trailing by 52 runs on the second day | दुसऱ्या दिवसाखेर भारत 52 धावांनी पिछाडीवर

दुसऱ्या दिवसाखेर भारत 52 धावांनी पिछाडीवर

Next

ऑनलाइन लोकमत
धर्मशाळा, दि. 26 - पहिल्या डावात कांगारूंनी दिलेल्या 300 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने दुस-या दिवशी संयमी फलंदाजी केली. दुसऱ्या दिवसाचा खेळ थांबला तेव्हा भारताने सहा गड्यांच्या मोबदल्यात 248 धावा केल्या आहेत. भारत अजून 52 धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या दिवसाखेर रविंद्र जाडेजा (16) आणि वृद्धमान साहा(10) नाबाद आहेत. के.एल राहुल (60), पुजारा (57) आणि कर्णधार अजिंक्य रहाणे (46) यांच्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारताने दिवसभरात 248 धावा केल्या. मुरली विजय आणि करुण नायर फलंदाजीत अपयशी ठरले.

चहापानापर्यंत दोन गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा करत कांगारुनां भारताने चोख प्रत्युत्तर दिले. दुस-या दिवसाची सुरूवात भारतासाठी खराब झाली. 11 धावांवर सलमीवीर मुरली विजयला जलदगती गोलंदाज जॉश हेझलवूडने स्लीपमध्ये झेल देण्यास भाग पाडलं. त्यानंतर मैदानावर आलेल्या चेतेश्वर पुजारा आणि लोकेश राहुलने टिच्चून फलंदाजी करत आणखी विकेट जाणार नाही याची काळजी घेतली. पण उपहारानंतर ही जोडी फोडण्यात कांगारूंना यश आलं. भारताने पहिल्या सत्रात 64 धावा केल्यानंतर दुसऱ्या सत्रात धावांचा वेग वाढवला. दुसऱ्या सत्रात भारताने 89 धावा केल्या. मात्र या सत्रात भारताने लोकेश राहुलच्या रुपात महत्त्वपूर्ण फलंदाज गमावला. कमिन्सने अर्धशतकवीर राहुलला तंबूत पाठवले

पहिल्या दिवशी चायनामॅन फिरकी गोलंदाज कुलदिप यादवच्या गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाला 300 धावांवर रोखले. पाहुण्या संघाने कर्णधार स्टीव्ह स्मिथचे शतक (१११) तसेच डेव्हिड वॉर्नर (५६) आणि मॅथ्यू वेड (५७) यांच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर पहिल्या डावात ३०० धावा उभारल्या.

एकवेळ १ बाद १४४ अशा सुुस्थितीत असलेल्या आॅस्ट्रेलियाची उपाहारानंतर चेंडूचा ताबा घेणाऱ्या कुलदीप यादवच्या फिरकीसमोर अवस्था बिकट झाली. कुलदीपने कांगारूंच्या तीन फलंदाजांना माघारी पाठवल्यानंतर कर्णधार स्मिथने एकाकी झुंज देत डाव सावरण्याचा प्रयत्न केला. रविचंद्रन आश्विनने स्मिथचा अडसरही दूर करत भारताला मोठे यश मिळवून दिले. स्मिथ बाद झाल्यावर मॅथ्यू वेडने झुंजार खेळी करत संघाला ३०० चा पल्ला गाठून दिला.

बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथ्या आणि निर्णायक कसोटीत नाणेफेक जिंकून आॅस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. खेळपट्टी बघून भारतीय संघात पाच गोलंदाजांचा समावेश करण्यात आला. खांदेदुखीमुळे बाहेर बसलेल्या विराट कोहलीच्या अनुपस्थितीत नेतृत्व करणाऱ्या अजिंक्य रहाणेचा विश्वास गोलंदाजांनीही सार्थ ठरवला. उमेश यादवने सलामीची जोडी फोडली. त्याने सलामीवीर मॅट रॅनशॉला त्रिफळाचीत केले.

कर्णधार स्मिथने डेव्हिड वॉर्नरच्या सोबतीने शतकी (दुसऱ्या गड्यासाठी १३४ धावा) भागीदारी करत संघाला सुस्थितीत नेले. ही जोडी भारतीय गोलंदाजांवर डोईजड ठरेल, असे दिसत असतानाच कुलदीप यादव भारताच्या मदतीला धावून आला. कुलदीपने डेव्हिड वॉर्नरला ५६ धावांवर असताना बाद केले. वॉर्नर स्लीपमध्ये अजिंक्य रहाणेकडे झोल सोपवून माघारी परतला. त्यानंतर उमेश यादवने शॉन मार्शलाही अवघ्या चार धावांवर बाद करत आॅस्ट्रेलियाला तिसरा धक्का दिला. कुलदीपने पीटर हँड्सकॉम्ब आणि मॅक्सवेलचा अडथळा दूर केला तर कर्णधार स्मिथ १११ धावांवर बाद झाला. यादवने चार, उमेश यादवने दोन तसेच आश्विन, भुवनेश्वर आणि जडेजा यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.

Web Title: India were trailing by 52 runs on the second day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.