भारत-वेस्टइंडिज मालिका जुलैत
By admin | Published: December 24, 2015 11:55 PM2015-12-24T23:55:54+5:302015-12-24T23:55:54+5:30
भारत-वेस्टइंडिज संघात क्रिकेट सामन्यांवरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी जुलै-आॅगस्टमध्ये वेस्टइंडिज दौरा करण्यात येणार आहे.
सेंट जोन्स : भारत-वेस्टइंडिज संघात क्रिकेट सामन्यांवरुन सुरु असलेल्या वादावर पडदा पडला आहे. दोन्ही देशांतील क्रिकेटसंबंध वृद्धींगत करण्यासाठी पुढील वर्षी जुलै-आॅगस्टमध्ये वेस्टइंडिज दौरा करण्यात येणार आहे. या दौऱ्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका होईल.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष शशांक मनोहर व वेस्टइंडिज क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष डेव कॅमरन यांच्यातील चर्चेनंतर या दौऱ्याची घोषणा करण्यात आली.
विंडीज क्रिकेट संघाने आपल्या बोर्डासोबत झालेल्या वादामुळे मागच्यावर्षी आॅक्टोबरमध्ये भारताचा दौरा अर्ध्यावर रद्द केला होता. त्यावर बीसीसीआयने आश्चर्य व्यक्त करीत विंडीजला तंबी दिली होती. विंडीजने काढता पाय घेताच बीसीसीआयने तातडीने श्रीलंकेला वन डे मालिका खेळण्यासाठी पाचारण केले होते. विंडीज बोर्डाने मात्र आपल्या खेळाडूंच्या गैरवर्तणुकीबद्दल बीसीसीआयची माफी मागितली होती. तो अर्धवट सोडलेला दौरा पूर्ण करण्याची विंडीज बोर्डाची इच्छा आहे. डब्ल्यूआयसीबी अध्यक्ष डेव्ह कॅमेरून यांनी बीसीसीआय अध्यक्ष शशांक मनोहर यांच्याशी यासंदर्भात चर्चा केली. विंडीज २०१६ मध्ये भारतीय संघाला आपल्या देशात आमंत्रित करणार असल्याची माहिती कॅमेरून यांनी चर्चेनंतर दिली. आॅक्टोबर २०१४ मध्ये आयोजित हा दौरा वेळेआधी संपविण्यासाठी आमचे खेळाडू दोषी आहेत; पण ती उणीव भरून काढावी लागेल. (वृत्तसंस्था)