भारत यंदाही खेळणार सायंकाळच्या सत्रात
By admin | Published: December 31, 2016 01:59 AM2016-12-31T01:59:26+5:302016-12-31T01:59:26+5:30
टेनिस चाहत्यांचा विचार करता भारत सलग दुसऱ्यांदा डेव्हिस कप लढत सायंकाळच्या सत्रात खेळणार आहे. आशिया ओसियाना गट एकमध्ये भारत आणि न्यूझीलंड
नवी दिल्ली : टेनिस चाहत्यांचा विचार करता भारत सलग दुसऱ्यांदा डेव्हिस कप लढत सायंकाळच्या सत्रात खेळणार आहे. आशिया ओसियाना गट एकमध्ये भारत आणि न्यूझीलंड संघादरम्यानची लढत ३ फेब्रुवारीपासून पुणे येथे खेळली जाणार आहे.
शुक्रवारी एकेरीची लढत दुपारी ३ वाजता सुरू होणार आहे, तर त्यानंतरच्या दिवशी दुहेरीची लढत सायंकाळी ६ वाजता सुरू होईल. रविवारी खेळला जाणारा परतीचा एकेरीचा सामना ३ वाजता सुरू होईल.
स्पेनविरुद्ध दिल्लीमध्ये सप्टेंबर महिन्यात विश्व ग्रुप प्ले आॅफ लढतीदरम्यान एकेरीचे सामने सायंकाळी ५ वाजता, तर दुहेरीची लढत रात्री ७ वाजता सुरू झाली होती. वेळेबाबत खेळाडूंसोबत चर्चा करण्यात आली, पण कर्णधार आनंद अमृतराजचा सल्ला घेण्यात आला नाही. कारण अमृतराज तोपर्यंत पदावर कायम राहतील किंवा नाही, याबाबत एआयटीएमध्ये साशंकता होती.
‘एआयटीए’चे सचिव हिरणमय चॅटर्जी यांनी सांगितले की, ‘स्पर्धा संचालक सुंदर अय्यर यांनी चाहत्यांचा पाठिंबा मिळावा यासाठी सामने सायंकाळच्या सत्रात आयोजित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. निवड समितीचे अध्यक्ष एस. पी. मिश्रा यांनी खेळाडूंसोबत याबाबत चर्चा केली. आम्ही आयटीएफसोबत चर्चा केली. तापमानामध्ये अधिक फरक पडणार नसल्यामुळे त्यांनी याला मंजुरी प्रदान केली.’
काही बाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार एआयटीएचा आहे, असे चॅटर्जी यांनी सांगितले.
एआयटीएचे एक अधिकारी म्हणाले,‘आम्ही सायंकाळच्या सत्रात सामन्याचे आयोजन केले तर मुंबईहूनही लोकांना सामने बघण्यासाठी येता आणि परतही जाता येईल. भारत खेळत असताना स्टेडियम गर्दीने फुललेले असावे, असा आम्हाला वाटते.’ (वृत्तसंस्था)
लढतीच्या वेळेबाबत माझ्यासोबत चर्चा करण्यात आलेली नाही, पण याचा सामन्याच्या निकालावर फरक पडणार नाही. फेब्रुवारी महिन्यात लढत होणार असल्यामुळे सामन्याच्या निकालावर विशेष परिणाम होणार नाही. पुण्यात चेन्नईसारखे दमट वातावरण नसते, पण मी स्वत: खेळत असतो, तर दिवसा खेळण्याला पसंती दर्शवली असती. - आनंद अमृतराज