भारत अव्वल ५० देशांमध्ये नक्की येईल
By admin | Published: July 29, 2016 01:14 AM2016-07-29T01:14:53+5:302016-07-29T01:14:53+5:30
भारतात सध्या रग्बीचा जोर वाढत असून युवांमध्ये रग्बीचे क्रेझ वाढत आहे. गेल्या काही वर्षांत भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही छाप पाडली असून येणाऱ्या काही वर्षांत नक्कीच भारत
मुंबई : भारतात सध्या रग्बीचा जोर वाढत असून युवांमध्ये रग्बीचे क्रेझ वाढत आहे. गेल्या काही वर्षांत भारताने आंतरराष्ट्रीय स्पर्धेतही छाप पाडली असून येणाऱ्या काही वर्षांत नक्कीच भारत अव्वल ५० संघांमध्ये असेल, असा विश्वास आशियाई रग्बी संघटनेचे उपाध्यक्ष आगा हुसैन यांनी केले. भारतात रग्बी खेळाचा अधिक प्रसार करण्यासाठी आणि राष्ट्रीय संघाला सहाकार्य करण्यासाठी नुकताच भारतीय रग्बी संघटनेने आंतरराष्ट्रीय रग्बी क्षेत्रातील नावाजलेल्या प्रायोजकासह करार केला. या अंतर्गत बुधवारी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमामध्ये आगा यांनी आपले मत व्यक्त केले.
‘‘जागतिक क्रमवारीत सध्या भारतीय संघ ७७ व्या स्थानी आहे. तर ३२ संघांच्या आशियाई क्रमवारीत भारतीय संघ १२व्या स्थानी आहे. पुढील पाच वर्षांमध्ये भारतीय रग्बीला असेच आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळत राहिले, तर नक्कीच जगातील अव्वल ५० देशांमध्ये भारताचा समावेश झालेला पाहण्यास मिळेल,’’ असेही आगा यांनी यावेळी सांगितले.
रग्बी इंडियाचे जनरल सेक्रेटरी महेश मथाई यांनी सांगितले की, ‘‘काही वर्षांपासून रग्बीला भारतात मोठा प्रतिसाद मिळत आहे. पुर्वी एका विशिष्ट वर्गापर्यंत मर्यादित असलेला हा खेळ आज देशातील प्रत्येक राज्यात खेळला जात आहे. विशेष म्हणजे शालेय खेळाडूंसह महिला खेळाडूंचाही मोठ्या प्रमाणात सहभाग झाला असल्याने खऱ्या अर्थाने हा खेळ आज भारतात रुजू लागला आहे. ’’ (क्रीडा प्रतिनिधी)