विश्व बॉक्सिंग स्पर्धेत भारताला कठीण ‘ड्रॉ’, सर्व बॉक्सर उपउपांत्यपूर्व फेरीसाठी रिंगणात उतरणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:46 AM2017-08-26T00:46:45+5:302017-08-26T00:47:01+5:30
शिवा थापा आणि विकास कृष्णन यांना सलामी लढतीत पुढे चालसह अव्वल मानांकन देण्यात आले असले तरी १९ व्या विश्व बॉक्सिंग स्पर्धेत कठीण ड्रॉ मिळाल्याने आठही भारतीयांची विजयाची वाट सोपी राहणार नाही.
हॅम्बुर्ग : शिवा थापा आणि विकास कृष्णन यांना सलामी लढतीत पुढे चालसह अव्वल मानांकन देण्यात आले असले तरी १९ व्या विश्व बॉक्सिंग स्पर्धेत कठीण ड्रॉ मिळाल्याने आठही भारतीयांची विजयाची वाट सोपी राहणार नाही.
विकासला मिडलवेटमध्ये (७५ किलो) तिसरे मानांकन मिळाले. शिवाला लाईटवेट(६० किलो) गटात पाचवे मानांकन लाभले. सुमित सांगवान(९१ किलो) याला सहावे मानांकन देण्यात आले. सर्व बॉक्सर उपउपांत्यपूर्व फेरीसाठी रिंगणात उतरतील. सहा वर्षांपूर्वी कांस्य जिंकणाºया विकासला २७ आॅगस्ट रोजी केनियाचा जॉन कयालो आणि इंग्लंडचा बेंजामिन विटेकर यांच्यातील विजेत्याविरुद्ध लढत द्यावी लागेल. शिवाला २८ आॅगस्ट रोजी कझाखस्तानचा अॅडिलेट कुरमेतोव्ह आणि जॉर्जियाचा ओतर इरानोस्यान यांच्यातील विजेत्याविरुद्ध खेळायचे आहे. शिवाने २०१५ च्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये कांस्य जिंकले होते.
आशियाई चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये शिवा आणि अबुदुवइमोव यांच्यात अटीतटीची लढत झाली होती. प्रतिस्पर्धी खेळाडूने हेडबट मारताच शिवा रक्तबंबाळ झाला होता. आशियाई चॅम्पियनशिपचा रौप्य विजेता सुमित २७ आॅगस्ट रोजी आॅस्ट्रेलियाच्या जासन वेटले याच्याविरुद्ध खेळेल. त्यानंतर त्याची गाठ पडेल ती कझाखस्तानचा आॅलिम्पिक रौप्य विजेता बेसली लेविटविरुद्ध तिसरा मानांकित लेविट याने सुमितला ताश्कंद आशियाई चॅम्पियनश्पिमध्ये हरविले होते.
मनोज कुमारला (६९ किलो) सलामीला व्हेसिली बेलोसचे आव्हान असेल. त्यानंतर त्याची गाठ पॅन अमेरिकन सुवर्ण विजेता गॅब्रिएल जोस मास्ट्रे पेरेझ याच्याविरुद्ध पडेल. आशियाई कांस्य विजेता सतीश कुमार(९१ किलोच्यावर), कविंदर बिश्त(५२ किलो), गौरव विधुडी (५६ किलो) आणि अमित फांगल(४९ किलो) हे देखील रिंगणात उतरणार आहेत.(वृत्तसंस्था)