रियो स्पर्धेत भारताला मिळतील १२ पदके
By admin | Published: July 9, 2016 03:25 AM2016-07-09T03:25:38+5:302016-07-09T03:25:38+5:30
रियो आॅलिम्पिक स्पर्धेत १२ पदक जिंकण्याची शक्यता रेटिंग एजन्सी प्राईस वॉटर हाऊस कुपर्सने वर्तवली आहे. ५ ते २१ आॅगस्ट दरम्यान ब्राझीलची राजधानी रियो दी जेनेरोत होणाऱ्या
नवी दिल्ली : रियो आॅलिम्पिक स्पर्धेत १२ पदक जिंकण्याची शक्यता रेटिंग एजन्सी प्राईस वॉटर हाऊस कुपर्सने वर्तवली आहे. ५ ते २१ आॅगस्ट दरम्यान ब्राझीलची राजधानी रियो दी जेनेरोत होणाऱ्या या स्पर्धेत भारताने आतापर्यंतचा सर्वांत जास्त सदस्य असलेला संघ उतरवला आहे.
रियो आॅलिम्पिकमध्ये भारतीय अॅथलिट्सची संख्या १०० च्या वर आहे. त्यामुळे भारत किती पदके जिंकेल, याबाबत सर्वत्र उत्सुकता आहे. भारताने लंडन आॅलिम्पिकमध्ये ८३ खेळाडूंचा संघ उतरवला होता. त्यात दोन रौप्य, चार कांस्यपदकांसह सहा पदकांची कमाई केली होती. यावेळी पीडब्ल्यूसीने लंडन आॅलिम्पिकच्या तुलनेत सहा पदकांची संख्या वाढवली. असे असले तरी या संस्थेने म्हटले की, पदकांच्या संख्येत किंचीत फरक होऊ शकतो.
पदक संख्येचा अंदाज व्यक्त करण्यासाठी पीडब्लूसी देशाची अर्थव्यवस्था, मागील दोन आॅलिम्पिक स्पर्धेतील कामगिरी, देश यजमान कोणता आहे, आदी बाबी तपासते.
आॅलिम्पिक स्तरावर आपली लोकसंख्या आणि जीडीपीच्या तुलनेत कमी प्रदर्शन करणाऱ्या देशांमध्ये पीडब्लूसीच्या मॉडेलनुसार लंडन स्पर्धेच्या तुलनेत भारताच्या पदकांची संख्या दुप्पट होण्याचा अंदाज आहे.
भारतीय आॅलिम्पिक संघानेदेखील १० ते १५ पदके जिंकण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मंत्री जितेंद्र सिंह यांनी देखील भारताच्या पदकांची संख्या या स्पर्धेत दुप्पट होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तर कालच क्रीडा मंत्रालयाचा पदभार सांभाळणारे विजय गोयल म्हणाले की, रियो स्पर्धेतील संधी समोर पाहता कोणताही अंदाज व्यक्त करत येणार नाही. याबाबत नंतर अंदाज व्यक्त करता येईल. मात्र, भारताचा शंभरपेक्षा जास्त सदस्यांचा संघ नक्कीच चांगले प्रदर्शन करेल, असेही गोयल म्हणाले.
- प्राईस वॉटर कुपर्सने लंडन आॅलिम्पिकमध्ये भारत किमान सहा पदके जिंकेल, असे भाकीत केले होते. हे भाकीत त्यावेळी खरे देखील ठरले. पीडब्लूसीने लंडन आॅलिम्पिकमध्ये अमेरिका ११३ पदक जिंकेल, असे भाकीत केले होते. या स्पर्धेत अमेरिकेने १०३ पदकांची कमाई केली, तर चीन ८७ पदके पटकावेल, अशी भविष्यवाणी केली होती. त्यावेळी चीनने ८८ पदके पटकावली होती.
- लंडन आॅलिम्पिकचा यजमान देश ब्रिटन ५४ पदके जिंकेल, असे भाकीत केले असताना ब्रिटनने ६५ पदकांची कमाई केली, तर रशियासाठी ७३ पदकांचे भाकीत केले होते. रशियाने ८१ पदके पटकावली. पीडब्लूसीने केलेले भाकीत आणि प्रमुख देशांनी पटकावलेली पदके यात फारसे अंतर दिसून येत नाही.
- आतापर्यंत भारताचे १०५ खेळाडू रियोसाठी पात्र ठरले आहेत. आणखी काही खेळाडू पात्र ठरण्याची शक्यता आहे. भारताची सदस्य संख्या ११० आहे. आतापर्यंत ५७ पुरुष आणि ४८ महिला खेळाडूंचा यात समावेश आहे.
- चार वर्षांपुर्वी लंडन आॅलिम्पिकमध्ये भारताने कुस्ती आणि नेमबाजीत दोन, बॅडमिंटन आणि बॉक्सिंगमध्ये प्रत्येकी एका पदकाची कमाई केली होती. यावेळी पुन्हा एकदा कुस्ती, नेमबाजी आणि बॅडमिंटनमध्ये पदक मिळण्याचा आशा आहे. या सोबतच महिला धर्नुविद्या संघ, पुुरुष हॉकी संघ आणि टेनिस मिश्र दुहेरीत पदक मिळण्याची शक्यता आहे.
- नेमबाजीत जितू राय, गगन नारंग आणि अभिनव बिंद्रा, कुस्तीत योगेश्वर दत्त आणि नरसिंग यादव,बॅडमिंटनमध्ये सायना नेहवाल, दिपीका कुमारी, बोम्बायला देवी व लक्ष्मी राणी मांझी यांचा महिला तिंरदाजी संघ पदक मिळवून देऊ शकतो.
- सानिया मिर्झा, रोहन बोपन्ना यांचा मिश्र दुहेरीचा संघ तसेच एफआयएच चॅम्पियन्स चषकात रौप्य पदक पटकावणारा पुरुष हॉकी संघ देखील भारताला पदक मिळवून देऊ शकतो.