भारत न्यूझीलंडला कडवी झुंज देणार
By admin | Published: June 23, 2015 01:35 AM2015-06-23T01:35:46+5:302015-06-23T01:35:46+5:30
बेल्जियमविरुद्ध पहिल्या सामन्यात आक्रमक पवित्रा न अवलंबल्यामुळे १-0 ने पराभव पत्कराव्या लागणाऱ्या भारतीय महिला संघाला त्याच्या
एंटवर्प : बेल्जियमविरुद्ध पहिल्या सामन्यात आक्रमक पवित्रा न अवलंबल्यामुळे १-0 ने पराभव पत्कराव्या लागणाऱ्या भारतीय महिला संघाला त्याच्या व्यूहरचनेत बदल करून हॉकी विश्व लीग सेमीफायनलमध्ये उद्या न्यूझीलंडविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळविण्याच्या वज्रनिर्धाराने मैदानात पाऊल ठेवावे लागेल.
न्यूझीलंडने पहिल्या सामन्यात पोलंडचा १२-0 असा धुव्वा उडवला होता, तर भारताला निसटता पराभव पत्करावा लागला होता. भारतीय संघ अखेरच्या दोन क्वॉर्टरमध्ये जास्त आक्रमकता दाखवू शकला नाही आणि त्याचे नुकसान त्यांना सोसावे लागले; परंतु खेळाडूंना पुढील सामन्यात मुसंडी मारण्याचा विश्वास आहे.
भारतीय संघाची कर्णधार रितू राणी म्हणाली, ‘‘यजमान संघ बेल्जियमविरुद्ध पहिला सामना कठीण होता. न्यूझीलंड संघ चांगला असून, हा सामना आमच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. पहिल्या सामन्यातील निकाल आमच्यासाठी अनुकूल नसला, तरी आम्ही आशा गमावलेली नाही आणि उद्याच्या सामन्यात निश्चितच मुसंडी मारू.’’
भारत आणि न्यूझीलंड संघ हाकबे कपमध्ये एकमेकांविरुद्ध लढले होते. त्यात भारतीय संघाला १-४ असा पराभवाचा सामना करावा लागला होता. ग्लास्गो राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेत दोन्ही संघांनी एकमेकांविरुद्ध प्रत्येकी एक विजय मिळविला होता. भारतीय संघासाठी ही स्पर्धा रियो आॅलिम्पिकला क्वॉलिफाय करण्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे आणि त्यामुळे ते आपल्या कामगिरीत कोणतीही कसर सोडू इच्छित नाहीत.
गेल्या सामन्यात भारतीय गोलरक्षक सविताने सुरेख खेळ केला होता; परंतु भारताला पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करण्यासाठी खेळात सुधारणा करावी लागेल. मजबूत रक्षण आणि जबरदस्त पोझिशनिंगमुळे भारतीय संघ न्यूझीलंडला अडचणीत पकडू शकतो. भारत आणि न्यूझीलंड या महिला संघांदरम्यानचा हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी साडेपाच वाजता सुरू होईल. (वृत्तसंस्था)