भारत ‘प्लेआॅफ’मधील स्थान पक्के करणार
By admin | Published: July 17, 2015 03:25 AM2015-07-17T03:25:24+5:302015-07-17T03:25:24+5:30
भारतीय संघ उद्या येथे डेव्हिस कप एशिया ओशियाना ग्रुप एच्या लढतीत न्यूझीलंड संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी उतरेल तेव्हा त्यांचे लक्ष्य हे प्रतिस्पर्धी संघाला
ख्राईस्टचर्च : भारतीय संघ उद्या येथे डेव्हिस कप एशिया ओशियाना ग्रुप एच्या लढतीत न्यूझीलंड संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी उतरेल तेव्हा त्यांचे लक्ष्य हे प्रतिस्पर्धी संघाला पराभूत करून प्ले आॅफमध्ये स्थान मिळविण्याचे असेल. या लढतीत विजयी ठरणारा संघ विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये स्थान मिळविणार आहे.
भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध दुसऱ्या फेरीच्या या लढतीत विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. येथील तापमान ५ ते ७ अंशांच्या जवळपास आहे आणि भारतीय खेळाडूंना अशा हवामानात खेळण्याची सवय नाही. हा सामना वाइल्डिंग
पार्क टेनिस सेंटरच्या इनडोअर
कोर्टवर खेळवला जाणार
आहे. कागदावर भारतीय संघ न्यूझीलंडच्या तुलनेत खूप तुल्यबळ आहे. भारताकडे एकेरीतील सोमदेव देववर्मन (१४८), युकी भांबरी (१५१) हे यजमानांच्या तुलनेत अधिक रँकिंगचे खेळाडू आहेत.
विम्बल्डनच्या उपांत्य फेरीत पोहोचणाऱ्या बोपन्नाच्या उपस्थितीने संघाची ताकद आणखी वाढली आहे. तो दुहेरीत वैयक्तिक क्रमवारीत दहाव्या स्थानावर आहे. त्याच्याबरोबर साकेत मायनेनी असेल. न्यूझीलंड संघात जोस स्टॅथम हा सर्वांत चांगली क्रमवारी असणारा खेळाडू आहे. त्याची क्रमवारी
३४५ आहे, तर मायकेल व्हीनस एकेरीत खेळणार आहे. त्याचे रँकिंग
५४८ आहे. दुहेरीत तो टॉप ५०मध्ये आहे. त्याचप्रमाणे आर्टम सिताक
(४३) आणि मार्कस डॅनियल (६६) हेदेखील दुहेरीच्या अव्वल १००मध्ये आहेत.
तथापि, अमेरिकेत चॅलेंजर टुर्नामेंट जिंकून येथे पोहोचणाऱ्या संघाला सहज घेऊन चालणार नाही, असे सोमदेव म्हणाला. तो म्हणाला, की येथील परिस्थिती खरोखरीच आमच्यासाठी प्रतिकूल आहे. येथील हवामानात खेळण्याची सवय नाही आणि त्यांच्या खेळाडूंविरुद्ध आम्हाला गांभीर्यानेच खेळावे लागेल. येथपर्यंत पोहोचण्यासाठी त्या खेळाडूंनी चांगले टेनिस खेळले आहे. त्यांनी या वर्षाच्या प्रारंभी चीनसारख्या तुल्यबळ संघाला पराभूत केले आहे.
तो पुढे म्हणाला, की स्टॅथम आणि व्हीनस यांनी एकेरीत मिळवलेला विजय महत्त्वाचा आहे. काय करायला हवे, हे त्यांना चांगले माहीत आहे. विशेषत: ते न्यूझीलंडमध्ये खतरनाक आहेत. मला आणि युकीला उद्या चांगले आव्हान मिळण्याची आशा आहे.
युकीचा माजी दुहेरीचा जोडीदार व्हीनस पहिल्या सामन्यात सोमदेवशी दोन हात करील. याविषयी युकी म्हणतो, की मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखतो. तो जेव्हा लयीत असतो तेव्हा खतरनाक खेळाडू
असतो आणि सोमदेवसाठी ही
लढत सोपी असणार नाही.
या लढतीतील विजयी ठरणारा संघ सप्टेंबर महिन्यात विश्व ग्रुप प्लेआॅफमध्ये खेळणार आहे.