चौथ्या कसोटीत भारताला फारशी अडचण येणार नाही
By admin | Published: March 24, 2017 11:41 PM2017-03-24T23:41:56+5:302017-03-24T23:41:56+5:30
भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. आपली फलंदाजीही चांगली होत आहे. त्यामुळे, धरमशाळा येथे होणारा चौथा आणि अंतिम कसोटी
रोहित नाईक / मुंबई
भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करीत आहे. आपली फलंदाजीही चांगली होत आहे. त्यामुळे, धरमशाळा येथे होणारा चौथा आणि अंतिम कसोटी सामना जिंकण्यात भारताला फारशी अडचण येणार नाही असे मला वाटते,’ असा विश्वास भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला.
मुंबईत शुक्रवारी दिव्यांग खेळाडूंच्या आंतर विभागीय टी२० क्रिकेट स्पर्धेची घोषणा झाली. यावेळी वाडेकर यांनी आपले मत मांडले. संघाच्या कामगिरीबाबत त्यांनी सांगितले की, ‘भारताकडे सध्या खरंच खूप चांगली फलंदाजी आहे. कर्णधार विराट कोहली आणि इतर फलंदाज चांगली कामगिरी करीत असून संघाला बळकटी आणत आहेत. त्यामुळे, धरमशाला येथे होणाऱ्या आॅस्टे्रलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताला खूप काही अडचणी येतील असे दिसत नाही. आपण नक्की विजयी होऊ.’
या कसोटी सामन्यासाठी सर्वांचे लक्ष कर्णधार कोहलीकडे लागले आहे. खांदा दुखावल्याने त्याच्या खेळण्यावर शंका निर्माण झाल्याने असे झाल्यास संघाची धुरा अजिंक्य रहाणे सांभाळेल. कर्णधारपद रहाणेकडे आल्यास सचिन तेंडुलकरनंतरचा तो पहिलाच मुंबईकर कर्णधार ठरेल.
याबाबत वाडेकर म्हणाले की, ‘कोहली वयाने फार मोठा नाही. त्याच्याकडे बरेच क्रिकेट शिल्लक आहे. अजिंक्य आणि विराट दोघेही चांगले मित्र आहेत. ते एकमेकांना कायम सांभाळून घेतात. फलंदाजी करताना हे दिसून येते. मला वाटते की, जोपर्यंत विराटकडे कर्णधारपद आहे तोपर्यंत अजिंक्यने घाई न करता थांबलेले चांगले, पण मुंबईकर असल्याने अजिंक्यकडेही जन्मजात नेतृत्वाचे गुण आहेत, असे मला वाटते. जर खरंच विराट चौथ्या सामन्यात खेळला नाही, तर अजिंक्य नक्कीच सहजपणे भारताचे नेतृत्व सांभाळेल यात शंका नाही.’