भारत प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार

By admin | Published: June 24, 2015 01:13 AM2015-06-24T01:13:36+5:302015-06-24T05:31:22+5:30

बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमाविल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघापुढे बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या वन-डे लढतीत प्रतिष्ठा राखण्यासह

India will play to maintain prestige | भारत प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार

भारत प्रतिष्ठा राखण्यासाठी खेळणार

Next

मीरपूर : बांगलादेशविरुद्ध प्रथमच मालिका गमाविल्यानंतर अडचणीत आलेल्या भारतीय संघापुढे बुधवारी खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या व अखेरच्या वन-डे लढतीत प्रतिष्ठा राखण्यासह यजमान संघाला क्लीन स्वीप करण्यापासून रोखण्याचे आव्हान आहे.
पहिल्या दोन लढतींत पराभव स्वीकारावा लागल्यामुळे मालिकेत ०-२ ने पिछाडीवर असलेला भारतीय संघ टीकेचे लक्ष्य ठरला आहे, पण कर्णधार महेंद्रसिंह धोनीने संघसहकाऱ्यांची पाठराखण करताना संघात उपलब्ध सर्वोत्तम खेळाडूंचा समावेश असल्याचे म्हटले आहे.
पहिल्या लढतीत ७९ धावांनी पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघाला दुसऱ्या लढतीत ६ गड्यांनी पराभवाला सामोरे जावे लागले. या दोन्ही लढतींत यजमान संघाने खेळाच्या प्रत्येक विभागात भारतीय संघापेक्षा सरस कामगिरी केली. भारतीय संघ अखेरच्या लढतीत विजयासह आपली प्रतिष्ठा राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. यंदा विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणाऱ्या भारतीय संघासाठी मालिकेत ‘व्हाईटवॉश’लाजीरवाणी बाब ठरेल.
आत्मविश्वास उंचावलेल्या बांगलादेश संघाला पराभूत करण्यासाठी भारतीय संघाला खेळाच्या प्रत्येक विभागात सरस कामगिरी करावी लागेल. आघाडीच्या फळीतील फलंदाज चांगल्या फॉर्मात नसून मधल्या फळीतील फलंदाजही उपयुक्त भागीदारी करण्यात अपयशी ठरले आहेत. उमेश यादव व मोहित शर्मा यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांना बांगलादेशातील खेळपट्ट्यांवर धावगतीवर अंकुश राखण्यात अपयश आले. फिरकीपटू अक्षर पटेल व रवींद्र जडेजा यांनाही छाप सोडता आली नाही.
दुसऱ्या बाजूचा विचार करताना बांगलादेशने खेळाच्या प्रत्येक विभागात चमकदार कामगिरी केली आहे. त्यामुळे विश्वक्रिकेटमध्ये त्यांचा दर्जा उंचावत असल्याचे संकेत मिळत आहेत. पाकिस्तानला अलीकडेच क्लीनस्वीप देणाऱ्या मशरफी मूर्तजाच्या नेतृत्वाखालील संघ भारताविरुद्धही त्याच कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास प्रयत्नशील आहे. बांगलादेशच्या फलंदाजांनी दोन्ही लढतींत चमकदार कामगिरी केली. पहिल्या सामन्यात ३०७ धावा फटकाविणाऱ्या बांगलादेशला गोलंदाजीमध्ये नवा हीरो मुस्तफिजूर रहमान गवसला आहे. या डावखुऱ्या वेगवान गोलंदाजाने पहिल्या दोन सामन्यांत ११ बळी घेत इतिहास नोंदवताना भारतीय फलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे.
आकड्यांचा विचार करता, बुधवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत भारताचे पारडे वरचढ भासत असले, तरी फॉर्मचा विचार करता बांगलादेश क्लीन स्वीपचा प्रबळ दावेदार आहे. आपण क्लीन स्वीप करण्याचे अतिरिक्त दडपण घेणार
नसल्याचे बांगलादेशाचा कर्णधार मूर्तजाने स्पष्ट केले.
मूर्तजा म्हणाला, ‘‘कसलेच दडपण नाही. मालिकेपूर्वी कुणीच भाष्य केले नव्हते, की आम्ही मालिका जिंकण्यात यशस्वी ठरू.’’ भारतानेही आमच्याकडे गमावण्यासाठी काहीच नसल्यामुळे आम्ही मैदानावर केवळ खेळाचा आनंद घेणार असल्याचे स्पष्ट केले आहे. धोनी म्हणाला, ‘‘आमच्याकडे उपलब्ध सर्वोत्तम खेळाडू आहेत; पण त्यांना
येथील परिस्थितीसोबत जुळवून घेता आलेले नाही.’’
रविवारी पराभवानंतर प्रतिक्रिया देताना धोनी म्हणाला, ‘‘उपखंडात खेळताना अतिरिक्त फिरकीपटूसह खेळायचे किंवा नाही, याचा विचार करावा लागेल. भुवनेश्वर कुमार वेगाने मारा करीत नाही; पण तरी तो धावगतीवर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी ठरतो. त्यामुळे सर्वोत्तम समतोल
कसा राखता येईल, यावर लक्ष
द्यावे लागेल.’’(वृत्तसंस्था)

Web Title: India will play to maintain prestige

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.