बरोबरी साधण्यास भारत प्रयत्नशील
By admin | Published: June 21, 2015 01:14 AM2015-06-21T01:14:20+5:302015-06-21T01:14:20+5:30
मालिका गमाविण्याचे दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली रविवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय
मीरपूर : मालिका गमाविण्याचे दडपण असताना भारतीय संघ महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली रविवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या वन-डे आंतरराष्ट्रीय सामन्यात सर्वोत्तम कामगिरी करण्याच्या निर्धाराने उतरणार आहे.
तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या लढतीत ७९ धावांनी पराभव स्वीकारणाऱ्या भारतीय संघावर बांगलादेशविरुद्ध प्रथमच वन-डे मालिका गमाविण्याचे संकट निर्माण झाले आहे. या व्यतिरिक्त पहिल्या लढतीत धाव घेण्याच्या प्रयत्नात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर कर्णधार धोनीला ७५ टक्के सामना शुल्क गमवावे लागले. मालिकेत बरोबरी साधण्यासाठी भारताचा मार्ग खडतर आहे. कारण गेल्या काही कालावधीपासून बांगलादेश सातत्याने चांगली कामगिरी करीत आहे. आयसीसी विश्वकप क्रिकेट स्पर्धेत अंतिम आठ संघात स्थान मिळविल्यानंतर मशरफी मूर्तजाच्या नेतृत्वाखाली बांगलादेश संघाने मायदेशात पाकिस्तानचा वन-डे मालिकेत ३-० ने पराभव केला.
बांगलादेशने त्यानंतर पहिल्या वन-डे लढतीत भारतासारख्या बलाढ्य संघाचा पराभव करीत प्रतिभा असल्याचे सिद्ध केले. याव्यतिरिक्त कर्णधार धोनीला गेल्या काही दिवसांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही आणि अलीकडेच त्याच्या ‘कॅप्टन कुल’च्या प्रतिमेला धक्का बसला आहे. धाव घेताना मुद्दाम धक्का मारल्यामुळे धोनीला दोन सामन्यांच्या बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागले नाही, हे नशीब. विश्वकप स्पर्धेत झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाविरुद्ध ८५ धावांची खेळी आणि आॅस्ट्रेलियाविरुद्ध उपांत्य फेरीतील पराभवादरम्यान केलेली ६५ धावांची खेळी, याचा अपवाद वगळता धोनीला अलीकडच्या कालावधीत लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.
२०११ च्या विश्वकप स्पर्धेनंतर आकड्यांचा विचार करता फिरकीपटूंविरुद्ध धोनीचा स्ट्राईक रेट जवळजवळ ६६ पर्यंत घसरला आहे. डावखुऱ्या गोलंदाजांविरुद्ध धोनीला चौकार ठोकण्यासाठी ३२ चेंडूंची प्रतीक्षा करावी लागत आहे. साकिब अल हसनविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, रविवारी खेळल्या जाणाऱ्या लढतीत पावसाचा व्यत्यय निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय संघाला मालिकेत बरोबरी साधण्यासाठी पूर्ण सामना व्हावा, अशी अपेक्षा आहे. शिखर धवन गेल्या लढतीत अपयशी ठरला असला तरी गेल्या काही लढतींमध्ये त्याची कामगिरी उल्लेखनीय ठरली आहे. धवनकडून कसोटी सामन्यातील कामगिरीची पुनरावृत्ती अपेक्षित आहे. एकमेव कसोटी सामन्यात त्याने मोठी शतकी खेळी केली होती. रोहित शर्मा वन-डेमध्ये मोठी खेळी करण्यास सक्षम आहे.
कसोटी कर्णधार विराट कोहलीची वन-डेमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्याला सूर गवसेल, अशी अपेक्षा आहे. अजिंक्य रहाणेही प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजवण्यास सक्षम आहे. गोलंदाजांकडून कर्णधार धोनीला चमकदार कामगिरीची आशा आहे. उमेश यादव अनेक दिवसांपासून संघाचा स्थायी खेळाडू आहे, पण त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव दिसून येतो. पहिल्या लढतीत त्याच्या दिशाहीन माऱ्याचा भारताला फटका बसला. मोहित शर्माला गेल्या काही दिवसांपासून तिसरा गोलंदाज म्हणून धोनीची पसंती लाभली आहे, पण पहिल्या लढतीत त्याने पाच षटकांत ५० पेक्षा अधिक धावा बहाल केल्या. भुवनेश्वर कुमारचा वेग कमी असल्यामुळे धोनीची अडचण वाढली आहे. भुवनेश्वर सुरुवातीला १३० किलोमीटर वेगाने गोलंदाजी करीत होता, पण आता त्याच्या गोलंदाजीचाा वेग १२५ च्या आसपास असतो. त्यामुळे संघाचा मुख्य गोलंदाज रविचंद्रन अश्विनवर दडपण येते. अश्विन व काही अंशी सुरेश रैनाच्या गोलंदाजीमुळे पहिल्या लढतीत भारतीय संघ बांगलादेशला ३०७ धावांत रोखण्यात यशस्वी ठरला.
गेल्या काही दिवसांमध्ये बांगलादेश संघाच्या वन-डे क्रिकेटमधील कामगिरीमध्ये बरीच सुधारणा झाली आहे. बांगलादेश संघात युवा व अनुभवी खेळाडूंचे चांगले मिश्रण आहे.
साकिब-अल-हसन, मुशफिकुर रहीम, तमीम इक्बाल व कर्णधार मशरफी मूर्तजा या अनुभवी खेळाडूंकडून बांगलादेश संघाला चमकदार कामगिरीची आशा आहे. सलामीवीर सौम्या सरकार व वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान यांनी छाप सोडली आहे.(वृत्तसंस्था)
भारत :- महेंद्रसिंग धोनी (कर्णधार), रोहित शर्मा, अजिंक्य रहाणे, शिखर धवन, विराट कोहली, सुरेश रैना, अंबाती रायडू, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, मोहित शर्मा, स्टुअर्ट बिन्नी व
धवल कुलकर्णी.
बांगलादेश :- मशरफी मूर्तजा (कर्णधार), तमीम इक्बाल, सौम्या सरकार, मोमिनुल हक, मुशफिकुर रहीम, साकिब-अल-हसन, शब्बीर रहमान, नासिर हुसेन, अराफात सनी, तास्किन अहमद, रुबेल हुसेन, रोनी तालुकदार, मुस्तफिजूर रहमान व लिट्टन दास.