आॅस्ट्रेलियाविरूद्ध भारत ३-०ने जिंकेल : भज्जी
By admin | Published: February 21, 2017 10:02 PM2017-02-21T22:02:48+5:302017-02-21T22:02:48+5:30
भारतीय दौऱ्यावर आलेला आॅस्ट्रेलियाचा संघ कमजोर आहे. त्यांनी चांगला खेळ केला तरी, भारतीय संघ ही मालिका ३-०ने जिंकेल, असे भाकीत भारताचा आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने मंगळवारी पुण्यात वर्तवले.
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 21 : भारतीय दौऱ्यावर आलेला आॅस्ट्रेलियाचा संघ कमजोर आहे. त्यांनी चांगला खेळ केला तरी, भारतीय संघ ही मालिका ३-०ने जिंकेल, असे भाकीत भारताचा आॅफ स्पिनर हरभजनसिंग याने मंगळवारी पुण्यात वर्तवले.
पुण्यात सुरू असलेल्या २ दिवसीय क्रीडाविषयक साहित्य महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी तो बोलत होता. गेल्या आठवड्यात भज्जीने सध्या भारत दौयावर असलेला आॅस्ट्रेलियाचा संघ सर्वाधिक कमकुवत असल्याचे मत व्यक्त केले होते. त्याचा पुनरुच्चार करीत तो म्हणाला, ‘‘या संघात स्टीव्ह वॉ, मार्क वॉ, शेन वॉर्न, ग्लेन मॅग्रा, जस्टीन लँगर यांच्यासारखे दिग्गज नाहीत. तो संघ सगळीकडे जिंकला, केवळ भारताने त्यांची घोडदौड रोखली होती. त्या विजयाने भारतीय क्रिकेटला नवसंजीवनी मिळाली होती. त्या संघाच्या तुलनेत आता केवळ स्टीव स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर हेच दोन चांगले खेळाडू आॅस्ट्रेलियाकडे आहेत. यामुळे आतापर्यंतच्या तुलनेतभारत दौऱ्यावर आलेला हा संघ सर्वाधिक कमकुवत आहे.’’
भारतीय कर्णधार विराट कोहलीची भज्जीने मुक्तकंठाने प्रशंसा केली. ‘‘त्याची भरारी कौतुकास्पद आहे. पहिल्या आयपीएल लिलावाच्या वेळी लालचंद राजपूतने विराटच्या गुणवत्तेची कल्पना दिली होती. कर्णधार म्हणून त्याने आतापर्यंत शानदार कामगिरी केलीय. विराटसमोर परदेशात जिंकण्याचे आव्हान असेल. तो स्वत:देखील ही कामगिरी करून दाखविण्यासाठी उत्सुक असेल,’’ असे भज्जी म्हणाला.