भारत ‘अ’चा दणदणीत विजय

By admin | Published: January 12, 2017 05:37 PM2017-01-12T17:37:12+5:302017-01-12T17:37:12+5:30

कर्णधार अजिंक्य रहाणेची (९१) आकर्षक अर्धशतकी खेळी आणि रिषभ पंतचा (५९) आक्रमक तडाखा या जोरावर भारत ‘अ’ संघाने आपल्या दुसºया सराव सामन्यात इंग्लंड

India A's winning sound | भारत ‘अ’चा दणदणीत विजय

भारत ‘अ’चा दणदणीत विजय

Next
>ऑनलाइन लोकमत
 
मुंबई, दि. 12 -  कर्णधार अजिंक्य रहाणेची (९१) आकर्षक अर्धशतकी खेळी आणि रिषभ पंतचा (५९) आक्रमक तडाखा या जोरावर भारत ‘अ’ संघाने आपल्या दुस-या सराव सामन्यात इंग्लंड इलेव्हनचा ६ विकेट्सने दणदणीत पराभव केला. सलामीवीर शेल्डन जॅक्सनने (५९) देखील शानदर अर्धशतकी खेळी करताना रहाणेसह भारत ‘अ’च्या विजयाचा पाया रचला. याआधी मंगळवारी झालेल्या सराव सामन्यात इंग्लंडने महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणा-या भारत ‘अ’ संघाचा ३ विकेट्सने पराभव केला होता.
ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या २८३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीयांनी ३९.४ षटकात ४ फलंदाजांच्या मोबदल्यात २८३ धावा काढल्या. रहाणे - जॅक्सन यांनी भारताला दमदार सुरुवात करुन देताना ११९ धावांची जबरदस्त सलामी दिली. मोईन अलीने जॅक्सनला बाद करुन इंग्लंडला पहिले यश मिळवून दिले. जॅक्सनने ५६ चेंडूत ७ चौकारांसह ५९ धावा काढल्या. यानंतर आलेल्या युवा रिषभ पंतने सर्व सुत्रे आपल्याकडे घेताना इंग्लंडच्या गोलंदाजांना चोपण्यास सुरुवात केले. त्याने केवळ ३६ चेंडूत ८ चौकार व २ षटकारांनी ५९ धावांचा धडाका करत भारतीय संघाच्या विजयाचा मार्ग मोकळा केला. आदिल रशिदने त्याला बाद करुन इंग्लंडची दमछाक थांबविली. 
एकाबाजूने खंबीरपणे उभ्या असलेल्या रहाणेने संघाच्या धावगतीवर कोणताही परिणाम पडू दिला नाही. मात्र, डेव्हीड विलीच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाल्याने तो नर्व्हस नाइंटीचा शिकार ठरला. ८३ चेंडूत १० चौकार व एका षटकारासह ९१ धावा काढून त्याने भारत ‘अ’च्या विजयात निर्णायक भूमिका बजावली. यानंतर अनुभवी सुरेश रैनाने (३४ चेंडूत ४५ धावा) भारताच्या विजयावर शिक्का मारला. 
तत्पूर्वी, भारत ‘अ’च्या युवा खेळाडूंनी नियंत्रित मारा करताना इंग्लंड इलेव्हनला २८२ धावांवर रोखले. मात्र, इंग्लंडची ९ बाद २११ अशी अवस्था केल्यानंतरही गोलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारत ‘अ’ला आव्हानात्मक धावसंख्येला सामोरे जावे लागेल. इंग्लंड कर्णधार इआॅन मॉर्गनने सलग दुसºयांदा नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. जॉनी बेयरस्टॉ (६५ चेंडूत ६४ धावा), अ‍ॅलेक्स हेल्स (५३ चेंडूत ५१ धावा) यांनी इंग्लंडला मजबूत धावसंख्या उभारुन देण्यास मोलाचे योगदान दिले. जम्मू-काश्मीरचा अष्टपैलू परवेझ रसूलने इंग्लंडची मधली फळी स्वस्तात बाद करताना त्यांची  २ बाद ११६ वरुन ६ बाद १६५ अशी अवस्था केली.  
यानंतर ठराविक अंतराने बळी गेल्याने  इंग्लंडची ३९व्या षटकात ९ बाद २११ अशी अवस्था झाली. परंतु, आदिल रशिद - डेव्हीड विली या अखेरच्या जोडीने  ७१ धावांची भागीदारी करुन इंग्लंडला आव्हानात्मक मजल मारुन देण्यात यश मिळवून दिले. ४९व्या षटकात सांगवानने रशिदला बाद करुन इंग्लंडचा डाव संपुष्टात आणला. रशिदने ४२ चेंडूत ४ चौकारांसह ३९ धावा काढल्या. तर, विली ३० चेंडूत २ चौकार व २ षटकार मारुन ३८ धावंवर नाबाद राहिला. 
भारत ‘अ’ कडून परवेझ रसूलने ३८ धावांत ३ बळी घेतले. त्याचप्रमाणे, प्रदीप सांगवान, अशोक दिंडा आणि शाहबाझ नदीम यांनी प्रत्येकी २ बळी घेत इंग्लंडच्या धावसंख्येला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. 
 
धावफलक :
इंग्लंड : जेसन रॉय हिटविकेट गो. सांगवान २५, अ‍ॅलेक्स हेल्स झे.रहाणे गो. नदीम ५१, जॉनी बेयरस्टो झे. पंत गो. दिंडा ६४, इआॅन मॉर्गन झे. व गो. नदीम ०, बेन स्टोक्स झे. किशन गो. रसूल ३८, जोस बटलर झे. व गो. रसूल ०, मोईन अली झे. पंत गो. दिंडा १, ख्रिस वोक्स त्रि. गो. रसूल १६, आदिल रशिद झे. पंत गो. सांगवान ३९, लियाम प्लंकेट झे. पंत गो. कौल ८, डेव्हीड विली नाबाद ३८. अवांतर - २. एकूण : ४८.५ षटकात सर्वबाद २८२ धावा.
गोलंदाजी : प्रदीप सांगवान ६.५-०-६४-२; सिध्दार्थ कौल ६-०-३१-१; अशोक दिंडा ८-१-५५-२; शाहबाझ नदीम १०-०-४१-२; आर. विनय कुमार ७-१-४७-०; परवेझ रसूल १०-१-३८-३; दीपक हुड्डा १-०-६-०.
भारत : अजिंक्य रहाणे त्रि. गो. विली ९१, शेल्डन जॅक्सन झे. बेयरस्टो गो. अली ५९, रिषभ पंत झे. हेल्स गो. रशिद ५९, सुरेश रैना झे. हेल्स गो. बॉल ४५, दीपक हुडा नाबाद २३, इशान किशन नाबाद ५. अवांतर - १. एकूण : ३९.४ षटकात ४ बाद २८३ धावा.
गोलंदाजी : 
ख्रिस वोक्स ७-१-५४-०; डेव्हीड विली ५-०-३२-१; जॅक बॉल ६-०-४६-१; बेन स्टोक्स ४.४-०-३०-०; आदिल रशिद ७-०-५१-१; मोईन अली ७-०-४६-१; लियाम प्लंकेट ३-०-२४-०.
 
‘ती’ गर्दी धोनीसाठीच....
मंगळवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवरच झालेल्या पहिल्या सराव सामन्यादरम्यान मुंबईकरांची तुफान गर्दी झाली होती. मात्र, दुसºया सराव सामन्यात त्यातुलनेत प्रेक्षकांची उपस्थिती होती. कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीचे अखेरचे नेतृत्व पाहण्यासाठी क्रिकेटप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती हे यावेळी स्पष्ट झाले. पहिल्या सामन्यादरम्यान स्टेडियममध्ये प्रवेश मिळवण्यासाठी क्रिकेटप्रेमींमध्ये रंगलेली चढाओढ दुसºया सामन्यादरम्यान पहायला मिळाली नाही. मात्र, दुसºया डावात अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील भारत ‘अ’ची फलंदाजी सुरु झाल्यानंतर मात्र, स्टेडियममध्ये हळूहळू गर्दी वाढू लागली.
 
संधी साधण्यात त्रिकूट यशस्वी...
दुसºया सराव सामन्यात कर्णधार अजिंक्य रहाणे, सुरेश रैना आणि युवा यष्टीरक्षक - फलंदाज रिषभ पंत यांच्या कामगिरीवर विशेष लक्ष होते. तसेच, आगामी इंग्लंडविरुध्दच्या एकदिवसीय आणि टी२० सामन्यापुर्वी लय मिळविण्यासाठी एकमेव सामना खेळण्याची संधी असल्याने या तिघांसाठीही हा सराव सामना महत्वपुर्ण होता. त्यात, तिघांनाही दमदार कामगिरी करण्यात यश आल्याने भारतीय संघात आनंदाचे वातावरण आहे. रहाणेचा इंग्लंडविरुद्धच्या आगामी मालिकेत एकदिवसीय संघात समावेश असून रैना व पंत यांनी टी२० संघात स्थान मिळवले आहे. पंतने सराव सामन्यात आक्रमक फटकेबाजी करताना स्वत:ला सिध्द केले आहे. तर, रहाणे व रैना यांनी दुखापतीनंतर पहिला सामना खेळताना तंदुरुस्ती सिध्द करतानाच आपली लय देखील मिळवली आहे.
 

Web Title: India A's winning sound

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.