आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस, स्क्वॅशमध्ये भारताची सुवर्ण मोहोर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2023 11:09 AM2023-10-01T11:09:18+5:302023-10-01T11:09:29+5:30

सातव्या दिवशी दोन सुवर्ण, दोन रौप्य; ३८ पदकांसह चौथे स्थान

India wins gold in tennis, squash at Asian Games | आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस, स्क्वॅशमध्ये भारताची सुवर्ण मोहोर

आशियाई क्रीडा स्पर्धेत टेनिस, स्क्वॅशमध्ये भारताची सुवर्ण मोहोर

googlenewsNext

हांगझाऊ : भारताने १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी शनिवारी टेनिस आणि स्क्वॅशमध्ये सुवर्णमय कामगिरी करीत दहाव्या सुवर्णावर नाव कोरले. यामुळे पदकांची एकूण कमाई ३८ इतकी झाली असून, गुणतालिकेत चौथे स्थान मिळवले आहे. यात १४ रौप्य आणि १४ कांस्य पदकांचा समावेश आहे.

भारताला आज पहिले सुवर्ण मिळाले ते टेनिसच्या मिश्र दुहेरीत. रोहन बोपन्ना-ऋतुजा भोसले यांच्या जोडीने सुवर्ण जिंकून दिल्यानंतर पुरुष स्क्वॅश स्पर्धेच्या अंतिम लढतीत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानचा २-१ असा दणदणीत पराभव करीत सुवर्णावर नाव कोरले. 

त्याआधी भारतीय नेमबाज सरबज्योतसिंग आणि दिव्या टीएस यांनी १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात मिश्र सांघिक स्पर्धेचे रौप्य जिंकले.

पुरुष हॉकीत भारताने पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा १०-२ ने पराभव करीत उपांत्यपूर्व फेरीत धडक दिली. टेबल टेनिसमध्ये सुतिर्था-अयहिका मुखर्जी यांनी ऐतिहासिक विजयासह उपांत्य फेरी गाठताच आणखी एक पदक पक्के झाले.

महिला मुष्टियुद्धात प्रीती पवार, लवलीना बोरगोहेन आणि नरेंद्र यांनी उपांत्य फेरी गाठताच भारताचे पदक निश्चित झाले. मात्र, मीराबाई चानू हिने भारोत्तोलनात निराशा केली.

बोपन्ना-ऋतुजा जोडीने जिंकले टेनिसचे सुवर्ण

अनुभवी रोहन बोपन्ना आणि युवा ऋतुजा भोसले या भारतीय मिश्र जोडीने आशियाई  क्रीडा स्पर्धेत शनिवारी टेनिसमध्ये सुवर्णपदक जिंकले. यंदा भारताचे टेनिस पथक किमान एका सुवर्णासह परतणार आहे. काल रामकुमार रामनाथन-साकेत मायनेनी यांनी पुरुष दुहेरीत रौप्यपदक जिंकले होते.

 एकेरीत अंकिता रैना आणि सुमित नागल हे पहिल्या फेरीत पराभूत झाले. पुरुष दुहेरीत बोपन्ना-यूकी भांबरी हेदेखील पहिल्याच सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडले होते. सुवर्णपदकाच्या लढतीत बोपन्ना-भोसले यांनी आज तैपेईच्या एन शूओ लिआंग आणि त्सुंग हाओ हुआंग या जोडीचा २-६, ६-३, १०-४ असा पराभव केला. पहिला सेट गमावल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये भारतीय जोडीने जोरदार कमबॅक केले. त्यांनी दुसरा सेट ४-३ अशा पिछाडीवरून जिंकला. तिसऱ्या सेटमध्ये टाय ब्रेकरवर भारतीय जोडीने १०-४ असा विजय मिळविला.

भारताने टेनिस प्रकारात बुसानमध्ये चार, २००६ ला दोहा येथे चार, २०१० ला ग्वांगझू येथे पाच, २०१४ च्या इंचियोन आशियाडमध्ये पाच, २०१४ ला जकार्ता येथे तीन पदके जिंकली आहेत.

भारताने पाकिस्तानला चारली धूळ, स्क्वॅशमध्ये जिंकले सुवर्ण

हांगझाऊ : भारताच्या पुरुष स्क्वॅश संघाने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या सातव्या दिवशी शनिवारी सुवर्ण लयलूट सुरूच ठेवताना पाकिस्तानला धूळ चारून सुवर्णपदकावर नाव कोरले. भारताने फायनलमध्ये पाकवर २-१ अशी मात केली. भारताचा महेश विरुद्ध पाकिस्तानचा नासिर अशी पहिली लढत झाली. त्यात पाकिस्तानने विजय मिळवून १-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर मात्र भारताच्या सौरभने पुढील लढत जिंकून १-१ अशी बरोबरी साधून दिली. तिसऱ्या लढतीत भारतीय खेळाडू अभयने पाकिस्तानच्या नूरवर पाच गेम्सच्या अटीतटीच्या  सामन्यात पहिला गेम जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये नूरने विजय मिळवला. तिसऱ्या गेममध्ये पाकिस्तानने विजय मिळवीत २-१ अशी आघाडी घेतली. त्यानंतर अभयने विजय मिळवत २-२ अशी बरोबरी साधली. पाचव्या आणि गेम निर्णायक गेममध्ये १२-१० अशा फरकाने विजय मिळवून भारताने सामना जिंकलाच, शिवाय सुवर्णपदक खिशात घातले. आशियाडमध्ये २०१० ला भारताचा स्क्वॅश संघ पहिल्यांदा खेळला होता.

Web Title: India wins gold in tennis, squash at Asian Games

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.