भारताने मालिका जिंकली
By admin | Published: July 13, 2015 12:44 AM2015-07-13T00:44:56+5:302015-07-13T00:44:56+5:30
मुरली विजय आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशकानंतर भुवनेश्वरच्या अप्रतिम माऱ्याच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या वन-डे मध्ये झिम्बाब्वेवर ६२ धावांनी विजय
हरारे : मुरली विजय आणि अजिंक्य रहाणेच्या अर्धशकानंतर भुवनेश्वरच्या अप्रतिम माऱ्याच्या बळावर भारताने रविवारी दुसऱ्या वन-डे मध्ये झिम्बाब्वेवर ६२ धावांनी विजय साजरा करीत तीन सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी मिळविली. भारताच्या ५० षटकांतील ८ बाद २७१ धावांचा पाठलाग करणारा यजमान संघ ४९ षटकांत २०९ धावांत बाद झाला.
भुवनेश्वरने ३३ धावा देत चार गडी बाद केले. ३ बाद ४३ अशा अवस्थेतून बाहेर झिम्बाब्वेला काढणारा चामू चिभाभा याची ७२ धावांची झुंज व्यर्थ ठरली. भारताने पहिला सामना चार धावांनी जिंकला होता. रहाणे-विजय यांनी दिलेली चांगली सुरुवात भारतीय संघासाठी लाभदायी ठरली. भारतीय फिरकी गोलंदाजांनीही शानदार मारा केला. हरभजन आणि अक्षर पटेल यांनी मधल्या षटकांत यजमान फलंदाजांना अक्षरश: बांधून ठेवले होते.
तत्पूर्वी, झिम्बाब्वेचा कर्णधार चिगुंबुराने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला़ भारताच्या मुरली विजय आणि कर्णधार अजिंक्य रहाणे यांच्या अर्धशतकांच्या बळावर झिम्बाब्वेविरुद्ध ८ गडी गमावून २७१ पर्यंत मजल मारली. विजयने ९५ चेंडूंत ७२ आणि रहाणेने ८३ चेंडूंत ६३ धावा ठोकल्या. या दोघांनी सलामीला २६ षटकांत ११२ धावांची भागीदारी रचत झकास सुरुवात केली.
झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टन चिगुंबुरा याने नाणेफेक जिंकून भारताला फलंदाजी दिली. फॉर्ममध्ये असलेल्या अंबाती रायुडूने ५० चेंडूंत तीन चौकारांसह ४१ धावा केल्या, पण मनोज तिवारी २२ आणि रॉबिन उथप्पा १३ हे दोघेही निवडकर्त्यांचा विश्वास जिंकण्यात अपयशी ठरले. स्टुअर्ट बिन्नीने अखेरच्या क्षणी १६ चेंडंूवर वेगवान २५ धावा केल्या. जखमी
पनयांगाराऐवजी संघात आलेला नेव्हिले मादजिवा याने ४७ धावा देत सर्वाधिक चार गडी बाद केले. मालिकेत १-० ने आघाडी घेणाऱ्या भारताची सुरुवात चांगली झाली. पण झिम्बाब्वेच्या शिस्तबद्ध माऱ्यापुढे दोन्ही सलामीवीरांना मोकळेपणाने खेळता येत नव्हते. रहाणे-विजय यांना उसळी घेणाऱ्या स्विंग चेंडूंमुळे ताळमेळ साधणे कठीण जात होते. पण रहाणेने खराब चेंडूंवर अप्रतिम फटके मारले. २२ व्या षटकात कर्णधाराचे अर्धशतक पूर्ण झाले. २६ व्या षटकात तो चामू चिभाभाकडे कव्हरमध्ये सोपा झेल देत परतला.
दुसऱ्या टोकावर असलेल्या विजयने वन डे पदार्पणाच्या पाच वर्षे चार महिन्यांनंतर पहिले अर्धशतक गाठले. यानंतर चिभाभा आणि व्हेटोरीला सलग दोन षटकार खेचले. मादजिवाला मोठा फटका मारण्याच्या नादात विजय झेलबाद झाला. रायुडूने विजयसोबत ४७ आणि तिवारीसोबत ४४ धावांची भागीदारी केली. यांनतर पाठोपाठ गडी बाद होत गेल्याने ३०० चा पल्ला गाठण्यात अपयश आले. केदार जाधवने अखेरच्या षटकात बाद होण्यापूर्वी १६ धावा कुटल्या.
मध्यमगती गोलंदाज भुवनेश्वर कुमार याने वन-डेत बळींचे अर्धशतक गाठले. सन २०१२ मध्ये पाकविरुद्ध पदार्पण करणाऱ्या भुवीने पहिल्याच चेंडूवर मोहम्मद हफिजला बाद करीत सनसनाटी पसरवली होती. आज ४९ व्या सामन्यात त्याने ५० बळी पूर्ण केले. अशी कामगिरी करणारा तो ३३वा भारतीय गोलंदाज आहे. २५ वर्षांच्या भुवीची सर्वोत्कृष्ट कामगिरी आठ धावांत चार बळी अशी आहे. १२ कसोटीत त्याचे २९ बळी आहेत.
भारत धावफलक
भारत : अजिंक्य रहाणे झे. रझा गो. चिभाभा ६३, मुरली विजय झे. वालेर गो. मादजिवा ७२, अंबाती रायुडू झे. वालेर गो. रझा ४१, मनोज तिवारी झे. व्हेटोरी गो. त्रिपानो २२, रॉबिन उथप्पा त्रि. गो. मादजिवा १३, स्टुअर्ट बिन्नी झे. रझा गो. व्हेटोरी २५, केदार जाधव झे. मुतुंबमी गो, मादजिवा १६, हरभजनसिंग नाबाद ५, अक्षर पटेल झे. रझा गो. मादजिवा १, भुवनेश्वर कुमार नाबाद ००, अवांतर : १३, एकूण : ५० षटकांत ८ बाद २७१ धावा. गडी बाद क्रम : १/११२, २/१५९, ३/२०३, ४/२०५, ५/२३३, ६/२६४, ७/२६६, ८/२६९. गोलंदाजी : व्हेटोरी ८-०-४७-१, त्रिपानो ९-०-४२-१, मादजिवा १०-०-४९-४, विलियम्स ५-०-२३-०, क्रेमर ५-०-३२-०, चिभाभा ५-०-२७-१, मस्कद्जा ४-०-२६-०, रझा ४-०-२५-१.
झिम्बाब्वे : सिबांडा झे, विजय गो. कुलकर्णी २, चिभाभा धावबाद ७२, मस्कद्जा झे. उथप्पा गो. कुमार ५, चिगुंबुरा झे. रहाणे गो. कुमार ९, विलियम्स त्रि, गो. पटेल २०, सिकंदर रझा झे. उथप्पा गो. हरभजन १८, आर. मुतुबामी झे. पटेल गो. बिन्नी ३२, क्रेमर झे. रहाणे गो. कुमार २७, मादजिवा धावबाद ००, त्रिपानो झे. पटेल गो. कुमार ६, व्हेटोरी नाबाद ८. अवांतर १०, एकूण : ४९ षटकांत सर्वबाद २०९ . गडी बाद क्रम : १/२४, २/३१, ३/४३, ४/९५, ५/१३०, ६/१३२, ७/१८४, ८/१८६, ९/१९५, १०/२०९. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार १०-३-३३-३, धवल कुलकर्णी ९-१-३९-१, हरभजनसिंग १०-०-२९-१, स्टुअर्ट बिन्नी ७-०-४२-१, अक्षर पटेल १०-१-४०-१, मुरली विजय ३-०-१८-०.
(वृत्तसंस्था)