भारताने मालिका ३-१ ने जिंकली
By admin | Published: February 8, 2017 11:49 PM2017-02-08T23:49:12+5:302017-02-08T23:49:12+5:30
भारताच्या अंडर १९ संघाने इंग्लंडच्या ज्युनिअर संघाविरुद्ध पाचवा आणि अखेरचा एकदिवसीय सामना टाय ठरल्याने पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली.
मुंबई : भारताच्या अंडर १९ संघाने इंग्लंडच्या ज्युनिअर संघाविरुद्ध पाचवा आणि अखेरचा एकदिवसीय सामना टाय ठरल्याने पाच सामन्यांची मालिका ३-१ ने जिंकली.
मालिकेत निर्णायक आघाडी घेतलेल्या भारतीय संघाला अखेरच्या चेंडूवर एका धावेची गरज होती; परंतु दहाव्या क्रमांकावरील फलंदाज इशान पोरेल झेलबाद झाला. त्यामुळे भारताचा संघ २२६ धावांवर सर्व बाद झाला. तत्पूर्वी, इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना ५० षटकांत ९ बाद २२६ धावा केल्या होत्या.
विजयाचा पाठलाग करणाऱ्या भारतीय संघाची सुरुवात खराब झाली आणि ५४ धावांतच त्यांनी ४ फलंदाज गमावले. त्यात पदार्पण करणाऱ्या मनजोत कालराने २१ धावांचे योगदान दिले. एस. राधाकृष्णन याने भारतीय संघाचा डाव सावरला. त्याने ९५ चेंडूंत ६५ धावा केल्या. यादरम्यान त्याला हेत पटेल (२३) याने साथ दिली. या दोघांशिवाय शिवासिंह (१३) बाद झाल्यानंतर भारताची स्थिती ७ बाद १३७ धावा झाली होती.
त्यानंतर गोलंदाजीत चमक दाखविणाऱ्या आयुष जामवाल (४०) आणि यश ठाकूर (३०) यांनी आठव्या गड्यासाठी ६५ धावांची भागीदारी केली. जामवाल ४७ व्या षटकात बाद झाला. दोन षटकानंतर ठाकूरदेखील बाद झाला. भारताला अखेरच्या ९ चेंडूंत ९ धावांची गरज होती. अशात हेराम्ब परब (नाबाद ५) याने चौकार मारत भारताच्या आशा जिवंत ठेवल्या; परंतु डावखुऱ्या लियाम पॅटरसन व्हाईटने अखेरच्या चेंडूवर पोरेल याला बाद केल्याने सामना टाय झाला. इंग्लंडकडून हेन्री ब्रुक्स सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने ३० धावांत ३ गडी बाद केले. आॅर्थर गोडसाल, डेलरे रॉलिन्स आणि जॅक ब्लॅथरविक यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले.
त्याआधी इंग्लंडच्या आघाडीच्या सर्वच फलंदाजांनी चांगली सुरुवात केली; परंतु ते त्याचे मोठ्या खेळीत बदल करू शकले नाहीत. जॉर्ज बार्टलेटने त्यांच्याकडून सर्वाधिक ४७ धावा केल्या, तर यष्टिरक्षक फलंदाज ओली पोप याने ४५ व विल जॅकने २८ धावांचे योगदान दिले.
भारताकडून आॅफस्पिनर जामवाल याने ४0 धावांत ३, तर वेगवान गोलंदाज पोरेल याने २५ धावांत २ गडी बाद केले. परब, ठाकूर, शिवा सिंह आणि मयंक रावत यांनी प्रत्येकी १ गडी बाद केला. या दोन संघांत आता दोन चारदिवसीय सामने खेळवले जाणार आहेत. त्यातील पहिला सामना १३ फेब्रुवारी रोजी नागपूरमध्ये होईल. दुसरा सामना २१ पासूनच नागपूरमध्ये खेळवला जाईल.
संक्षिप्त धावफलक
इंग्लंड : ५0 षटकांत ९ बाद २२६.
(जॉर्ज बार्टलेट ४७, पोप ४५, विल जॅक २८)
भारतीय संघ : ५0 षटकांत सर्व बाद २२६. (एस. राधाकृष्णन ६५, आयुष जामवाल ४0, यश ठाकूर ३0. आयुष जामवाल ३/५२, ईशान पोरेल २/२५)