चक दे इंडिया! ७३ वर्षांत भारताने पहिल्यांदा जिंकला थॉमस कप
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2022 05:59 AM2022-05-16T05:59:14+5:302022-05-16T06:00:11+5:30
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी थॉमस चषक जिंकून इतिहास रचला.
भारतीय पुरुष बॅडमिंटन संघाने रविवारी थॉमस चषक जिंकून इतिहास रचला. ७३ वर्षांत भारताने या स्पर्धेत पटकावलेले पहिले पदक ठरले. अंतिम सामन्यात ही स्पर्धा १४ वेळा जिंकणाऱ्या इंडोनेशियावर भारताने ३-० असा विजय मिळवला.
अंतिम सामन्यांमध्ये भारतासमोर तगड्या इंडोनेशियाचे आव्हान होते. पुरुष एकेरीच्या पहिल्या सामन्यात लक्ष्य सेनने कडव्या संघर्षानंतर अँथोनी सिनिसुका गिंटींगवर ८-२१, २१-१७, २१-१६ असा विजय मिळवत, भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. दुहेरीत सात्विकराज रंकिरेड्डी व चिराग शेट्टी यांनीही ०-१ अशा पिछाडीवरून मुसंडी मारली. मोहम्मद अहसेन व केव्हिन संजया सुकामुल्जो यांच्या विरुद्ध १८-२१, २३-२१, २१-१९ असा जिंकून सात्विक-चिराग यांनी भारताची आघाडी २-० अशी मजबूत केली. यानंतर, स्टार किदम्बी श्रीकांतने जोनाथन ख्रिस्टीविरुद्ध २१-१३, २३-२१ असा विजय मिळवून इतिहास घडवला. भारताने ३-० अशा एकतर्फी फरकाने इंडोनेशियाला नमवून सुवर्ण पदक नावावर केले. आतापर्यंत केवळ सहाच देशांना थॉमस चषक जिंकता आलेला आहे.