भारत दुसऱ्यांदा वर्ल्ड चॅम्पियन
By admin | Published: February 13, 2017 12:12 AM2017-02-13T00:12:22+5:302017-02-13T00:12:22+5:30
यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटस्नी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळविले.
बंगळुरू : यजमान भारताने अंधांच्या टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ९ विकेटस्नी पराभव करीत दुसऱ्यांदा विश्वविजेतेपद मिळविले. सलामीवीर प्रकाश जयराम्मैया आणि कर्णधार अजय कुमार रेड्डी यांच्या शानदार फलंदाजीच्या जोरावर भारताने हा डबल धमाका केला.
प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने बदर मुनीरच्या ५७ धावांच्या मदतीने ८ बाद १९७ धावा केल्या. याला प्रत्युत्तर देताना भारताने १७.४ षटकांत २00 धावा करून विजय मिळविला. सामनावीर प्रकाशने ९९ धावांची नाबाद खेळी केली. कर्णधार रेड्डीने ४३ धावा केल्या. याच्यापूर्वी २0१२ मध्ये या दोन संघांत लढत झाली होती. त्यावेळीही भारताने विजय मिळविला होता. आजच्या विजयाने भारताने लीग सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. स्पर्धेत सर्वाधिक ५७0 धावा करणाऱ्या पाकिस्तानच्या बदर मुनीर याला स्पर्धावीरचा पुरस्कार देण्यात आला.
स्पर्धेत ९ पैकी ८ सामने जिंकणाऱ्या भारतीय संघाला प्रकाश आणि रेड्डीने पहिल्या विकेटसाठी १0.२ षटकांत ११२ धावांची उत्तुंग सलामी दिली होती. रेड्डी धावचित झाल्यानंतर केतन पटेलने प्रकाशला चांगली साथ दिली. केतनने २६ धावा केल्या. (वृत्तसंस्था)
पंतप्रधानांकडून अभिनंदन
टी-२० विश्वचषक स्पर्धेत विश्वविजेतेपद मिळविणाऱ्या भारतीय अंध संघाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे. मोदी यांनी टिष्ट्वटरवर म्हटले आहे की, भारताने अंधांचा टी-२० विश्वचषक जिंकल्यामुळे मी खूप खूश आहे. संघाचे अभिनंदन. त्यांच्या कामगिरीचा भारताला अभिमान आहे.
ऐतिहासिक कामगिरी
क्रीडामंत्री विजयकुमार गोएल यांनी संघाला पाठविलेल्या संदेशात म्हटले आहे की, अंधांच्या क्रिकेट संघाने क्रीडा क्षेत्राच्या इतिहासात सोनेरी अध्याय जोडला आहे. रिओ पॅरॉलिम्पिकमधील सफलतेनंतर ही ऐतिहासिक कामगिरी केली आहे.