भारत-झिम्बाब्वे लढत आज

By Admin | Published: July 10, 2015 02:10 AM2015-07-10T02:10:32+5:302015-07-10T02:10:32+5:30

झिम्बाब्वेविरुद्ध उद्या (शुक्रवार) पासून सुरू होत असलेल्या तीन वन डेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया बेंच स्ट्रेंग्थची ताकद अजमावणार आहे. युवा आणि सिनियर खेळाडू मिळालेल्या संधीचे सोने

India-Zimbabwe fight today | भारत-झिम्बाब्वे लढत आज

भारत-झिम्बाब्वे लढत आज

googlenewsNext

हरारे : झिम्बाब्वेविरुद्ध उद्या (शुक्रवार) पासून सुरू होत असलेल्या तीन वन डेतील पहिल्या सामन्यात टीम इंडिया बेंच स्ट्रेंग्थची ताकद अजमावणार आहे. युवा आणि सिनियर खेळाडू मिळालेल्या संधीचे सोने करण्याच्या निर्धाराने ही मालिका खेळणार आहेत.
बांगलादेशाविरुद्ध मालिका गमावणाऱ्या भारताचा हा पहिला विदेश दौरा असल्याने प्रतिस्पर्धी संघाला कमकुवत मानण्याची चूक अंगलट येऊ शकते. झिम्बाब्वेने गेल्या काही महिन्यांत चांगली कामगिरी केली आहे. सिनियर्सच्या अनुपस्थितीत संघाची धुरा सांभाळणारा अजिंक्य रहाणे याला स्वत:चा विश्वास सार्थ ठरवावा लागेल. मंद खेळपट्टीवर स्ट्राईक रेट रोटेट करण्यात रहाणे अपयशी ठरतो, अशी टीका धोनीने केली होती. पण, ही टीका सकारात्मक घेणार असल्याचे रहाणेने आधीच सांगून टाकले. मधल्याफळीत स्थाननिश्चितीसाठी त्याला धावा काढाव्याच लागतील. रॉबिन उथप्पा, मनोज तिवारी, केदार जाधव, अंबाती रायुडू आणि मनीष पांडे यांनादेखील निवडकर्त्यांचे लक्ष वेधायचे आहे. वेगवान माऱ्याची सुरुवात भुवनेश्वर करणार असून, त्याची साथ मोहित शर्मा देणार आहे. रहाणेने वेगवान गोलंदाजांना झुकते माप दिल्यास धवल कुलकर्णी याला संधी मिळू शकेल. सर्वांत अनुभवी हरभजनसिंग याच्यासोबत अक्षर पटेल फिरकी मारा करण्यासाठी सज्ज आहे. पाकच्या ऐतिहासिक दौऱ्यात झिम्बाब्वेने दोन वन डे सामन्यांची व त्यानंतर टी-२० मालिका गमावली. त्यांच्या खेळाडूंनी मात्र लक्ष वेधले होते. एल्टन चिगुंबुरा याच्या नेतृत्वात यजमान संघात सिकंदर रझा, वुसी सिबांडा, चामू चिभाभा यांचा समावेश असून, कोच डेव्ह वॉटमोर यांचा संघावर विश्वास आहे. वॉटमोर म्हणाले, ‘‘भारत आमच्या तुलनेत बलाढ्य आहे; पण हा मूळ संघ नव्हे. या संघाला आम्ही पराभूत करू शकतो.’’ चिगुंबुरा आणि सिकंदर रझा यांनी पाकमधील उष्ण वातावरणात शतके ठोकली. अनुकूल खेळपट्टीवर भारताविरुद्धही ते मोठी खेळी करू शकतात. हॅमिल्टन मस्कद्जा आणि सीन विलियम्स हेदेखील फलंदाजी बळकट करण्यात पटाईत आहेत.
--------------
झिम्बाब्वेला सहज घेणार नाही : रहाणे
४प्रतिस्पर्धी झिम्बाब्वेला सहज घेणार नसून माझे सहकारी शानदार कामगिरीच्या बळावर संघाला विजय मिळवून देण्याच्या निर्धाराने खेळतील, असा विश्वास टीम इंडियाचा युवा कर्णधार अजिंक्य रहाणे याने व्यक्त केला.
४अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत संघाचे नेतृत्व सांभाळणारा अजिंक्य म्हणाला, ‘झिम्बाब्वे चांगला तसेच संतुलित संघ असल्याची मला जाणीव आहे. ही मालिका अटीतटीची होईल,असा विश्वास असल्याने प्रतिस्पर्धी संघाला सहजपणे घेण्याची चूक करणार नाही. यजमान संघात चांगले फलंदाज, गोलंदाज आणि आॅलराऊंडर आहेत. पाकविरुद्ध या संघाने जो खेळ केला तो पाहता आम्ही कामगिरी उंचावून विजय मिळविण्यावर भर देणार आहोत.’
४आयसीसीच्या बदललेल्या वन डे नियमाबद्दल तो म्हणाला, ‘नव्या नियमांमुळे सामना आता अधिकच उत्कंठपूर्ण होईल.’ कर्णधारपदाची जबाबदारी कशी वाटते, असे विचारताच अजिंक्य म्हणाला, ‘ नेतृत्व करण्याची माझी तऱ्हा वेगळीच आहे. नव्या भूमिकेला न्याय देण्याचे शंभर टक्के प्रयत्न राहतील.’
४हा दौरा युवा खेळाडूंना प्रतिभा
सिद्ध करण्याची मोठी संधी असेल. तिन्ही सामने आम्ही अत्यंत
गंभीरपणे खेळणार असल्याचे
रहाणेने सांगितले.
--------------
भारत : अजिंक्य रहाणे (कर्णधार), रॉबिन उथप्पा, मुरली विजय, स्टुअर्ट बिन्नी, मनोज तिवारी, हरभजनसिंग, केदार जाधव, धवल कुलकर्णी, भुवनेश्वर कुमार, मनीष पांडे, अक्षर पटेल, अंबाती रायुडू, संदीप शर्मा आणि मोहित शर्मा.

झिम्बाब्वे : एल्टन चिगुंबुरा (कर्णधार), रेगिस चकाब्वा, चामू चिभाभा, ग्रीम क्रेमर, नेविले मेजिवा, हॅमिल्टन मस्कद्जा, रिचमंड मुतुंबामी, तिनाशे पेंगियांगरा, सिकंदर रझा, डोनाल्ड तिरिपानो, प्रॉस्पर उत्सेया, ब्रायन व्हिटोरी, माल्कम वॉलर आणि सीन विलियम्स.

Web Title: India-Zimbabwe fight today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.