भारताला आशियाई स्पर्धांपूर्वी मोठा धक्का! दुती चंदवर ४ वर्षांची बंदी, नक्की प्रकरण काय?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2023 03:18 PM2023-08-18T15:18:27+5:302023-08-18T15:18:49+5:30
बंदी का? या विरोधात अपील करण्याची मुभा आहे का? किती दिवस मिळणार? जाणून घ्या
Dutee Chand Ban, Dope Test Failed: भारताची स्टार धावपटू आणि राष्ट्रीय स्तरावरील विक्रमवीर दुती चंद पुढील ४ वर्षे रनिंग ट्रॅक वर दिसू शकणार नाही. स्पर्धेबाहेरील डोप चाचणीत अपयशी ठरल्याने दुतीवर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. 2021 इंडियन ग्रां प्रि 4 मध्ये दुतीने 11.17 सेकंदात 100 मीटर धावून एक राष्ट्रीय स्तरावरील नवा विक्रम प्रस्थापित केला होता. हा विक्रम सध्या फक्त तिच्याच नावावर आहे. पण आता तिच्यावर ४ वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
टाईम्सच्या वृत्तानुसार, ही बंदी 3 जानेवारी 2023 पासून सुरू होईल. 5 डिसेंबर 2022 रोजी नमुने घेण्यात आले. त्यानंतर, सर्व स्पर्धांमध्ये तिची कामगिरी, रेकॉर्ड आणि जिंकलेली पदके नाकारली जातील. अँटी-डोपिंग शिस्तपालन पॅनेल (ADDP) नुसार, खेळाडूने बंदी घातलेल्या पदार्थाच्या सेवनाच्या स्त्रोताविषयी पॅनेलला समाधानकारक उत्तर दिले नाही. तो विशिष्ट पदार्थ तिने निष्काळजीपणाने किंवा चुकून सेवन केल्याचेही तिला सिद्ध करता आले नाही. त्यामुळे तिच्यावर कारवाई केली जात आहे. ADDP ला असे आढळून आले की दुती हे नियमांचे उल्लंघन अनावधानाने होते हे सिद्ध करण्यात अयशस्वी झाली. ADDP नुसार - हे अजाणतेपणे घडले आहे हे स्पष्ट करण्यात ऍथलीट अयशस्वी ठरली.
दरम्यान, अहवालांच्या माहितीनुसार, खेळाडूने अधिकृत डॉक्टरांऐवजी तिच्या फिजिओथेरपिस्टचा सल्ला घेतला आणि लिहून दिलेली औषधे घेतली. दुतीने नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) च्या कलम २.१ आणि २.२ चे उल्लंघन केले आहे. NADA ADR 2021 च्या कलम 10.2.1.1 नुसार 3 जानेवारीपासून त्याच्यावर 4 वर्षांसाठी खेळांमध्ये भाग घेण्यास बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाविरुद्ध अपील करण्यासाठी तिच्याकडे २१ दिवसांचा अवधी आहे.