आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या वर्तनाची छाप सोडावी

By admin | Published: August 1, 2016 05:29 AM2016-08-01T05:29:18+5:302016-08-01T05:29:18+5:30

१५ आॅगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असेल त्याच वेळी रिओमध्ये कुठेतरी तिरंगा नक्कीच फडकताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.

Indian athletes should stop their behavior in the Olympics | आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या वर्तनाची छाप सोडावी

आॅलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी आपल्या वर्तनाची छाप सोडावी

Next


नवी दिल्ली : रिओ आॅलिम्पिकमध्ये भारतीय पथकाने केवळ खेळाच्या मैदानावरच नाही तर आपल्या वर्तनाने जगाच्या हृदयात स्थान मिळवण्याचे आवाहन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ आॅगस्ट रोजी भारतात स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण सुरू असेल त्याच वेळी रिओमध्ये कुठेतरी तिरंगा नक्कीच फडकताना दिसेल, असा विश्वास व्यक्त केला.
५ आॅगस्टपासून रिओमध्ये प्रारंभ होत असलेल्या आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या ११९ सदस्यांच्या पथकाला शुभेच्छा देण्यासाठी रविवारी मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमपासून जवाहरलाल नेहरू स्टेडियमपर्यंत ‘रन फॉर रिओ’ला रविवारी पंतप्रधान मोदी यांनी हिरवा झेंडा दाखविला.
या वेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘ज्या वेळी विदेशात भारतीय पथक जाते, त्या वेळी केवळ खेळाच्या मैदानातच भारत दिसतो असे नाही, आमचे खेळाडू आपल्या वर्तनाने सर्व जगाच्या हृदयात स्थान मिळवण्यात यशस्वी ठरतील आणि जगाला भारतीय संस्कृती व सभ्यतेची ओळख पटवून देतील, असा मला विश्वास आहे. याच कालावधीत रिओमध्ये प्रत्येक दिवशी कुठेतरी भारतीय तिरंगा फडकताना बघण्याचे भाग्य आपल्याला लाभेल.’’
पंतप्रधान पुढे म्हणाले, ‘‘प्रत्येक खेळाडूने हा टप्पा गाठण्यासाठी बरीच मेहनत घेतली असून, आॅलिम्पिकमध्ये हे खेळाडू सर्वोत्तम कामगिरी करतील, अशी आशा आहे. यापूर्वी खेळाडूंना तयारी करण्यासाठी अधिक कालावधी मिळत नव्हता; पण आता खेळाडूंना तेथील वातावरणासोबत जुळवून घेण्यासाठी किमान १५ दिवसांचा अवधी मिळतो.’’
या वेळी कार्यक्रमाला क्रीडामंत्री विजय गोयल प्रामुख्याने उपस्थित होते. रिओ आॅलिम्पिकचे टी-शर्ट परिधान केलेले जवळजवळ २० हजार शालेय विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करीत रिओमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने नागरिक व क्रीडाप्रेमी उपस्थित होते.
या वेळी भारताने आॅलिम्पिकसाठी ११९ सदस्यांचे पथक पाठविले आहे. आतापर्यंतच्या इतिहासात भारताचे हे सर्वांत मोठे पथक आहे. पंतप्रधानांनी सांगितले की, ‘सरकारने समिती स्थापन केलेली असून, खेळाडूंना विदेशातही भारतीय भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ही समिती कार्य करीत आहे. पांढरा सदरा व विजार परिधान केलेले मोदी आॅलिम्पिकच्या रंगात रंगलेले दिसले. मोदी यांनी २०२०च्या जपानमधील टोकियो आॅलिम्पिकसाठी २०० पेक्षा अधिक भारतीय खेळाडूंचे पथक उतरविण्याचे लक्ष्य असल्याचे या वेळी सांगितले. (वृत्तसंस्था)
>‘मन की बात’मध्ये रिओचीच चर्चा
रेडिओवरील ‘मन की बात’ कार्यक्रमात पंतप्रधानांनी या वेळी देशवासीयांना रिओ आॅलिम्पिकमध्ये सहभागी होत असलेल्या खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी शुभेच्छा देण्याचे आवाहन केले. त्यासाठी मी पोस्टमनची भूमिका बजावण्यास तयार असल्याचे सांगितले.
पंतप्रधानांनी ५ आॅगस्टपासून प्रारंभ होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकचा उल्लेख करताना म्हटले की, विश्वातील सर्वांत प्रतिष्ठेचा खेळाचा महाकुंभ सुरू होत असून, या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या भारतीय खेळाडूंचा उत्साह वाढविण्याची जबाबदारी देशवासीयांची आहे. सर्वांनी खेळाडूंना शुभेच्छा द्यायला हव्यात.
या खेळाडूंपर्यंत तुमचा संदेश पोहोचविण्यासाठी मी पोस्टमनची भूमिका बजावण्यास तयार आहे. देशवासी मला नरेंद्र मोदी अ‍ॅपवर खेळाडूंच्या नावाने शुभेच्छा पाठवू शकतात. मी तुमच्या शुभेच्छा खेळाडूंपर्यंत पोहोचविणार.’

Web Title: Indian athletes should stop their behavior in the Olympics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.