Paris Olympic 2024: भारताला पाच खेळाडूंकडून पदकांची आशा; २६ तारखेपासून ऑलिम्पिकचा थरार!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2024 05:27 PM2024-07-09T17:27:52+5:302024-07-09T17:45:55+5:30

paris olympics 2024 india : २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे.

Indian athletes Vinesh Phogat, PV Sindhu, Neeraj Chopra, Mirabai Chanu and Nikhat Zareen are expected to win medals in Paris Olympics 2024 | Paris Olympic 2024: भारताला पाच खेळाडूंकडून पदकांची आशा; २६ तारखेपासून ऑलिम्पिकचा थरार!

Paris Olympic 2024: भारताला पाच खेळाडूंकडून पदकांची आशा; २६ तारखेपासून ऑलिम्पिकचा थरार!

Paris Olympics 2024 News In Marathi : येत्या २६ जुलैपासून पॅरिस ऑलिम्पिकला सुरुवात होत आहे. ११ ऑगस्ट २०२४ पर्यंत या बहुचर्चित स्पर्धेचा थरार रंगेल. या स्पर्धेत भारताचे प्रमुख पाच खेळाडू वैयक्तिक पदक जिंकतील अशी आशा आहे. भालाफेकपटू नीरज चोप्राने मागील ऑलिम्पिकमध्ये अर्थात टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८५.९७ मीटर भाला फेकून सुवर्ण पदक जिंकले होते. भारतासाठी सुवर्ण जिंकणारा तो एकमेव खेळाडू होता. त्यामुळे यावेळीही नीरज सोनेरी कामगिरी करेल अशी आशा आहे.

तसेच देशातील नामांकित महिला पैलवान विनेश फोगट शानदार फॉर्ममध्ये आहे. अलीकडेच स्पेनमध्ये तिने सुवर्ण पदकाला गवसणी घातली. आता विनेश २० दिवसांसाठी फ्रान्सला गेली आहे. जिथे ती ऑलिम्पिकची तयारी करत आहे. तिच्याकडून भारतीयांना पदकाची आशा असेल यात शंका नाही. स्टार बॅडमिंटनपटू पी.व्ही सिंधूच्या खांद्यावर मोठी जबाबदारी आहे. सिंधूने यापूर्वी दोनवेळा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकण्याची किमया साधली आहे. त्यामुळे तिने पॅरिसमध्येही पदक जिंकल्यास ती पदकांची हॅटट्रिक मारणारी पहिली भारतीय ठरेल. 

टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करून रौप्य पदक जिंकणाऱ्या मिराबाई चानूवर सर्वांच्या नजरा असतील. तिने २००-२१० वजन उचलण्यात यश मिळवले तर भारताला पदक मिळेल हे निश्चित. ती आताच्या घडीला एनआयएस पटियाला येथे प्रशिक्षण घेत आहे. तिच्याशिवाय दोन वेळा वर्ल्ड चॅम्पियन राहिलेल्या निखत जरीनकडून तमाम भारतीयांना पदकाची आशा असेल. निखत आणि इतर पाच बॉक्सर जर्मनीच्या सारब्रुकेन येथील ऑलिम्पिक सेंटरमध्ये एक महिन्याचे प्रशिक्षण घेत आहेत.

दरम्यान, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताने सात पदके जिंकली होती. नीरज चोप्राच्या रूपात भारतात एकमेव सुवर्ण पदक आले. तर दोन रौप्य आणि चार कांस्य पदकांनी भारतीयांना जल्लोष करण्याची संधी दिली. 

Web Title: Indian athletes Vinesh Phogat, PV Sindhu, Neeraj Chopra, Mirabai Chanu and Nikhat Zareen are expected to win medals in Paris Olympics 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.