भारतीय बॅडमिंटनपटूंची घोडदौड! सायना, सिंधू, श्रीकांत, प्रणिथ उपांत्यपूर्व फेरीत
By admin | Published: June 22, 2017 08:00 PM2017-06-22T20:00:29+5:302017-06-22T20:00:29+5:30
ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची जबरदस्त कामगिरी सुरू आहे. महिला एकेरीमध्ये भारताच्या
Next
>ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 22 - ऑस्ट्रेलिया ओपन सुपर सीरिज बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय बॅडमिंटनपटूंची जबरदस्त कामगिरी सुरू आहे. महिला एकेरीमध्ये भारताच्या सायना नेहवाल, पी. व्ही. सिंधू यांनी तर पुरुष एकेरीत किदम्बी श्रीकांत आणि प्रणिथ यांनी विजयी घोडदौड कायम ठेवत स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
आज रंगलेल्या लढतींमध्ये पुरुष एकेरीत भारताच्या किदम्बी श्रीकांतने कोरियाच्या सोन वान हो याच्यावर 15-21, 21-13, 21-13 अशी मात करत उपांत्यपूर्व फेरी गाठली. तर पुरुष एकेरीतील अन्य एका लढतीत भारताच्या साई प्रणिथने चीनच्या हुआंग युझियांगवर 21-15, 18-21, 21-13 असा विजय मिळवला.
महिला एकेरीमध्येही भारतीय बॅडमिंटनपटूंचाच बोलबाला दिसून आला. महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूने चीनच्या चेन शिझियांग हिच्यावर 21-13, 21-18 अशी सरळ गेममध्ये मात करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. सायना नेहवालला मात्र विजय मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. तिने अटीतटीच्या लढतीत मलेशियाच्या सोनिया चेन हिचे आव्हान 21-15, 20-22, 21-14 असे परतवून लावत उपांत्यपूर्व फेरीचे तिकीट पक्के केले.
तत्पूर्वी काल झालेल्या सलामीच्या लढतींमध्ये किदाम्बी श्रीकांतसह, गतविजेती सायना नेहवाल आणि पी. व्ही. सिंधू यांनी आपआपल्या सामन्यात बाजी मारत विजयी सलामी दिली होती. मात्र इंडोनेशिया ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठलेला एचएस प्रणॉय, अजय जयराम आणि पारुपल्ली कश्यप या खेळाडूंना मात्र पहिल्याच फेरीत पराभवाचा धक्का बसला.