भारतीय बॅडमिंटन : 2017मध्ये पुरुष खेळाडूंनी गाजवले वर्चस्व
By admin | Published: July 2, 2017 07:57 PM2017-07-02T19:57:09+5:302017-07-02T19:57:09+5:30
एस. एस. प्रणय आणि बी. साई प्रणित यांच्या कामगिरीचा सातत्याने उंचावत जाणारा आलेख यामुळे भारतीय बॅडमिंटन वर्तुळासाठी यंदाचे उन्हाळी सत्र समाधानकारक राहिले.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 2 - के. श्रीकांतचा शानदार फॉर्म, एस. एस. प्रणय आणि बी. साई प्रणित यांच्या कामगिरीचा सातत्याने उंचावत जाणारा आलेख यामुळे भारतीय बॅडमिंटन वर्तुळासाठी यंदाचे उन्हाळी सत्र समाधानकारक राहिले. भारतीय पुरुष बॅडमिंटनपटूंनी महिला खेळाडूंच्या तुलनेत प्रथमच वर्चस्व गाजवले, हे विशेष.
सायना नेहवालच्या उदयानंतर महिला एकेरीमध्ये भारताने वर्चस्व गाजवण्यास सुरुवात केली. पी. व्ही. सिंधूचे आघाडीचे स्थान गाठणे म्हणजे महिला बॅडमिंटनपटूंच्या वर्चस्वाचा एक भाग ठरले. २०१० मध्ये सायनाने सिंगापूर, इंडोनेशिया व हाँगकाँग येथे तीन सुपर सिरिज विजेतेपद पटकावले. या व्यतिरिक्त तिने दिल्ली राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदकावर नाव कोरले. या कामगिरीची अद्याप एकाही भारतीय खेळाडूला बरोबरी साधता आलेली नाही.
यंदा २०१७ च्या जुलै महिन्यापर्यंत भारतीय बॅडमिंटनपटूंनी सहापैकी चार सुपर सिरिज स्पर्धांमध्ये जेतेपदाचा मान मिळवला. त्यात पी.व्ही. सिंधूने इंडिययन ओपनमध्ये पदकावलेले जेतेपद वगळले तर श्रीकांतच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष खेळाडूंनी यश मिळविल्याचे दिसून येते. श्रीकांतने इंडोनेशिया व आॅस्ट्रेलिया सुपर सिरिज स्पर्धांमध्ये सलग जेतेपद पटकावले तर साई प्रणितने श्रीकांतचा अंतिम फेरीत पराभव करीत सुपर सिरिजच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या दोन खेळाडूंनी जेतेपद पटकावले असताना प्रणयने जकार्तामध्ये आॅलिम्पिक रौप्यपदक विजेत्या ली चोंग वेई व रिओ आॅलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता चेन लोंग यांचा पराभव करीत चाहत्यांनी मने जिंकली.
श्रीकांतने २०१४ च्या चायन ओपन व २०१५ च्या इंडिया ओपनमध्ये जेतेपदाचा मान मिळवला आहे. श्रीकांत म्हणाला,ह्यगेले दोन आठवडे शानदार होते. केवळ माझ्यासाठीच नाही तर प्रणय व साई यांच्यासाठीही. पुरुष खेळाडूंची एकेरीतील वाटचाल शानदार आहे. आता आमच्याकडे विश्व चॅम्पियनशिपमध्येही पदक पटकावण्याची संधी आहे.
प्रणय म्हणाला, बॅडमिंटनची लोकप्रियता वाढत असल्यामुळे आणि मी त्याचा एक भाग असल्यामुळे मला आनंद झाला. आगामी दोन वर्षांमध्ये अव्वल १० मध्ये भारताचे तीन-चार खेळाडू असतील, अशी आशा आहे. भारताच्या सहा बॅडमिंटनपटूंचा जागतिक मानांकनामध्ये अव्वल ३५ मध्ये समावेश आहे. त्यात श्रीकांत, प्रणित व अजय अव्वल २० मध्ये आहेत. आॅलिम्पिक पदक विजेत्या सायना (लंडन आॅलिम्पिक कांस्यपदक) आणि पी.व्ही. सिंधू (रिओ आॅलिम्पिक रौप्य पदक) यांच्यानंतर आता पुरुष खेळाडूंनी आपली छाप सोडणे आवश्यक असल्याचे मुख्य प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी म्हटले आहे.
गोपीचंद म्हणाले, या खेळाडूंच्या यशामुळे आता पुरुष एकेरीला चांगले व्यासपीठ मिळाले आहे. या खेळाडूंचा कामगिरी बघता आगामी काही महिन्यांमध्ये आम्हाला चांगल्या निकालाची आशा आहे. या खेळाडूंननी कामगिरीत सातत्य राखणे आवश्यक आहे.
आॅगस्ट महिन्यात विश्व चॅम्पियनशिप व्यतिरिक्त काही सुपर सिरिज व सुपर सिरिज प्रीमिअर स्पर्धा होणार आहेत.