खुशी भारतीय बास्केटबॉल संघात, बंगळुरूला रंगणार आशियाई स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2017 01:17 AM2017-10-20T01:17:00+5:302017-10-20T01:17:22+5:30
रिबाऊंड, पाइंटर शूटिंग या कौशल्यात जबरदस्त वाकबगार असणारी औरंगाबादची प्रतिभावान उद्योन्मुख खेळाडू खुशी डोंगरे आता भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
औरंगाबाद : रिबाऊंड, पाइंटर शूटिंग या कौशल्यात जबरदस्त वाकबगार असणारी औरंगाबादची प्रतिभावान उद्योन्मुख खेळाडू खुशी डोंगरे आता भारतीय बास्केटबॉल संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे. बंगळुरू येथे २२ ते २८ आॅक्टोबरदरम्यान होणाºया १६ वर्षांखालील आशियाई बास्केटबॉल स्पर्धेसाठी खुशी डोंगरे हिची भारतीय संघात निवड झाली आहे.
देवगिरी महाविद्यालयात ११ वी इयत्तेत शिकणारी खुशी डोंगरे ही भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणारी मराठवाड्यातील पहिली खेळाडू ठरली आहे. राजनंदनगाव, छत्तीसगढ येथील युगांतर पब्लिक स्कूल येथे झालेल्या भारतीय संघाच्या सराव शिबिरातून तिची भारतीय संघात निवड झाली.
विशेष म्हणजे गतवर्षी एप्रिल महिन्यातदेखील तिची संभाव्य भारतीय संघात निवड झाली होती. या संभाव्य संघाचे शिबीरदेखील छत्तीसगढ येथेच झाले होते. बेगमपु-यातील औरंगाबाद चॅम्पियन क्रीडा मंडळात सराव करणाºया खुशीने आतापर्यंत अवघ्या दीड वर्षातच भारतीय संघात स्थान मिळवले आहे. तिने २०१५-२०१६ या वर्षातच कर्नाटकातील हसन, छत्तीसगड, नोएडा आणि हैदराबाद येथील राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करताना आपला विशेष ठसा उमटवला आहे. त्याचप्रमाणे तिने ८ राज्यस्तरीय बास्केटबॉल स्पर्धेत औरंगाबाद जिल्ह्याचे प्रतिनिधित्व केले आहे. जबरदस्त फिटनेस राखणाºया खुशीने वयाच्या १२ व्या वर्षापासून प्रशिक्षक संदीप ढंगारे आणि वडील अॅड. संजय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली बास्केटबॉल खेळाचा श्रीगणेशा केला.