भारतीय गोलंदाजांना जुन्या चेंडूने गोलंदाजी करता येत नाही - शोएब अख्तर
By admin | Published: February 4, 2016 02:19 PM2016-02-04T14:19:54+5:302016-02-04T14:43:25+5:30
चेंडू जुना झाल्यानंतर कशी गोलंदाजी करावी हे भारतीय गोलंदाजांना कळत नाही. ते रिव्हर्स स्विंग टाकू शकत नाहीत.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ४ - चेंडू जुना झाल्यानंतर कशी गोलंदाजी करावी हे भारतीय गोलंदाजांना कळत नाही. ते रिव्हर्स स्विंग टाकू शकत नाहीत असे मत रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने व्यक्त केले.
वेगवान गोलंदाजांसमोर नेहमीच परिस्थितीशी जुळवून घेण्याचे आव्हान असते. झटपट शिकण्याची तुमची इच्छा नसेल आणि तुम्ही जुळवून घेऊ शकला नाहीत तर, तुम्ही मागे पडता. भारताच्या झहीर खानला नवा आणि जूना चेंडू कसा हाताळावा हे चांगले माहित होते. तो नव्या आणि जुन्या चेंडूने गोलंदाजी करताना त्यातला आनंद घ्यायचा असे शोएबने म्हटले आहे.
आजच्या घडीला आर.अश्विन हा जगातला सर्वोत्तम ऑफस्पिनर आहे. तो एक बुद्धिमान गोलंदाज आहे. नेहमी सुधारणा करताना दिसतो. खेळपट्टी साथ देणारी असेल तर तो किती धोकादायक आहे हे त्याने दाखवून दिले आहे असे शोएबने सांगितले.
आज भारत आणि पाकिस्तान परस्पराविरुध्द जास्त क्रिकेट खेळत नाहीत हे निराशाजनक आहे. दोन्ही देशातल्या क्रिकेटपटूंच्या पिढयांनी भारत-पाकिस्तान सामन्यातला थरार, रोमांच अनुभवला आहे. या सामन्यामध्ये जो दबाव असतो तो तुम्हाला क्रिकेटपटू म्हणून अधिक परिपक्व बनवतो. आजची पिढी भारत - पाकिस्तान सामन्यातला तो थरार, रोमांच आणि जी चुरस असते त्यापासून वंचित रहात आहे असे शोएब अख्तर म्हणाला.