Nikhat Zareen on Hijab Row: मुस्लीम महिला अन् हिजाब.. यावर काय म्हणाली भारताची 'वर्ल्ड चॅम्पियन' बॉक्सर निखत झरिन
By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2022 08:44 PM2022-05-23T20:44:51+5:302022-05-23T20:46:04+5:30
निखत झरिनने भारतासाठी जिंकलं सुवर्णपदक
Nikhat Zareen on Hijab Row: भारतीय महिला बॉक्सर निखत झरिन हिने नुकतेच बॉक्सिंग वर्ल्ड चॅम्पियनशीप स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. तिने वर्ल्ड चॅम्पियन बनत भारतासाठी सुवर्णपदकाची कमाई केली. तिने मिळवलेल्या यशानंतर देशभरातून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. केवळ क्रीडाप्रेमीच नव्हे तर राजकीय नेतेमंडळी आणि सेलिब्रिटींनी देखील तिला विजयाबाबत शुभेच्छा दिल्या. या विजयानंतर, आता निखत एका वेगळ्या मुद्द्यामुळे चर्चेत आली आहे. नुकतीच एका मुलाखतीत निखतने मुस्लीम महिला आणि हिजाब या मुद्द्यावर अतिशय रोखठोक असे मत मांडले.
शाळा आणि महाविद्यालयात मुस्लीम विद्यार्थिंनी हिजाब परिधान केल्याच्या मुद्द्यावर जो वाद निर्माण झाला होता, त्यावर निखतला प्रश्न विचारण्यात आला. याबाबत निखतने स्पष्ट शब्दांत उत्तरं दिली. "कोणती वेशभुशा परिधान करावी हा ज्याचा-त्याचा प्रश्न आहे. मी इतरांच्या चॉईसवर कमेंट करणार नाही. मला स्वत:चा चॉईस आहे. मला जसे कपडे परिधान करायला आवडतात तसेच कपडे मी घालते. मी जे कपडे घालते त्याचा मला कोणताही फरक पडत नाही. माझं कुटुंब मला हिजाब घालण्याची सक्ती मूळीच करत नाही. त्यामुळे लोक माझ्याबाबत काय बोलत आहेत त्याच्याकडे मी फारसं लक्ष देत नाही", असं निखत म्हणाली.
"जर एखाद्या व्यक्तीला हिजाब परिधान करायचा असेल आणि त्यांच्या दृष्टीने ते म्हणजे धर्माचं पालन करणं असेल तर तो त्यांचा वैयक्तिक मुद्दा आहे. ते तशा पद्धतीने वागत असतील तर मला त्याची अजिबात अडचण वाटत नाही. ज्यांना हिजाब परिधान करावासा वाटतो त्यांनी तो खुशाल करावा. तो त्यांच्या स्वातंत्र्याचा आणि चॉईसचा प्रश्न आहे. इतरांनी कसं राहावं आणि काय वेशभुषा करावी हे मी कोणालाही सांगणार नाही.
दरम्यान, नुकतीच भारताची निखत झरिन वर्ल्ड चॅम्पियन बनली. तिने थायलंडच्या जितपाँग ज्युत्मासला ५-० असे नमवून इतिहास घडवला. महिला वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेतील (IBA Women's World Boxing Championship) ५२ किलो वजनी गटात तिने सुवर्णपदक पटकावले. या स्पर्धेतील भारताचे हे महिला गटातील एकूण १०वे सुवर्णपदक ठरले. मागील १४ वर्षांत मेरी कोमनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती पहिलीच भारतीय बॉक्सर ठरली.