भारतीय बुद्धिबळपटूंना संधी होती!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2018 09:03 PM2018-10-20T21:03:16+5:302018-10-20T21:03:43+5:30
शेवटची फेरी निर्णायक : गोवा आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेचा विजेता इदानी पौया याच्याशी संवाद
सचिन कोरडे : गोव्यात पहिल्यांदाच झालेल्या आंतरराष्ट्रीय ओपन ग्रॅण्डमास्टर बुद्धिबळ स्पर्धेवर नाव कोरले ते इराणच्या इदानी पौया याने. हा आंतरराष्ट्रीय ग्रॅण्डमास्ट सुरुवातीपासून संयुक्त आघाडीवर होता. मात्र, त्याला अव्वल स्थान मिळते की नाही, याबाबत शंका वाटत होती आणि म्हणूनच त्याने आपणास जेतेपदासाठी शेवटची फेरी निर्णायक ठरल्याचे सांगितले. सातव्या फेरीत भारतीय ग्रॅण्डमास्टरने जबरदस्त लढत दिली होती. त्यामुळे माझ्यासमोर शेवटची फेरी जिंकल्याशिवाय पर्याय नव्हता. नाहीतर, टायब्रेकरवर संधी गेली असती. या फेरीपूर्वी मी अत्यंत शांत आणि दबावमुक्त राहाण्याचा प्रयत्न केला. तो यशस्वी झाला, असे विजयानंतर इदानी म्हणाला. भारतात पहिल्यांदाच खेळणाऱ्या या खेळाडूने ‘लोकमत’शी संवाद साधला.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर झालेल्या स्पर्धेत २२ देशांतील एकूण १२०० खेळाडूंनी भाग घेतला होता. त्यात आघाडीच्या २२ ग्रॅण्डमास्टर्सचा समावेश होता. इराणच्या इदानी पौया, दीपन चक्रवर्ती, अभिजित कुंटे यांच्याकडे दावेदार म्हणून पाहिले जात होते. मात्र, सहाव्या आणि सातव्या फेरीत स्पर्धेचा रंग बदलला. संयुक्तरीत्या आघाडीवर असलेल्या खेळाडूंना शेवटच्या फेरीत मागे टाकत इदानी याने साडेआठ गुणांसह बाजी मारली. अर्मेनियाचा बाबुजियान लेवान हा उपविजेता तर भारताचा दीपन चक्रवर्ती हा तिसºया क्रमांकावर रहिला. या दोघांनी प्रत्येकी ८ गुण मिळविले.
इदानी म्हणाला की, गेल्या महिनाभरापासून मी खेळत होतो. त्याचा फायदा झाला. प्रत्येक सामन्यावर मी विशेष मेहनत घेतली. फायनलपर्यंत पहिले स्थान मिळवेन, असे वाटत नव्हते; कारण भारतीय खेळाडूंनीही चांगली कामगिरी केली. जिंकायचे असेल तर ड्रॉ वर समाधान मानून चालणार नाही, याची कल्पना होती; कारण कधी कधी आपण चांगले खेळतो; पण अपेक्षित निकाल मिळत नाही. निकाल चांगला लागतो; पण तुम्ही समाधानी नसता. या वेळी मात्र मी समाधानी आहे. आता मी रशियातील स्पर्धेत इराणच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व करणार आहे.
इराण बुद्धिबळाबद्दल...
गेल्या काही वर्षांत इराणमध्ये बुद्धिबळाचा चांगला विकास झाला आहे. आम्ही आशियाई स्पर्धा जिंकल्या आहेत. रॅपिड, ब्लित्झमध्ये आम्ही तीन सुवर्णपदके पटकाविली आहेत. चांगले खेळाडू तयार होत आहेत. आम्ही २०२२ मध्ये होणाºया आॅलिम्पियाड स्पर्धेची तयारी करीत आहोत. या स्पर्धेतही सुवर्णपदकाचे आमचे लक्ष्य असेल.